केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी तीन कोटींपेक्षा जास्त मिळकतकर थकविल्यानंतरही महापालिकेने त्यांच्यासाठी पायघड्या घातल्याचे स्पष्ट झाले आहे. राणे यांनी ३ कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांच्या थकबाकीपोटी २५ लाख रुपयांचा धनादेश महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडे जमा केल्यानंतर राणे यांची उर्वरित थकबाकीची रक्कम ‘शून्य’ करण्यात आली आहे. राजकीय दबावातूनच महापालिकेने थकबाकी शून्य केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे पोलिसांचा आता अमली पदार्थ विक्रीच्या साखळीकडे मोर्चा ; राज्यातील मेट्रो शहरात शोध मोहीम

राणे यांच्या मालकीच्या ‘आर डेक्कन’ या बहुउद्देशीय व्यापारी संकुलातील हॉटेल महापालिकेने थकीत मिळकतकर प्रकरणी लाखबंद केले होते. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. राणेंच्या मालकीच्या बहुउद्देशीय व्यापारी संकुलाची पाच कोटी ६० लाख रुपये थकबाकी होती, त्यापैकी १ कोटी ४० लाख रुपये एका मजल्याची थकबाकी भरण्यात आली. उर्वरित दोन मजल्यांची तीन कोटी ७७ लाख रुपये थकबाकी भरावी, यासाठी प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र, राणे यांच्याकडून थकबाकी भरण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे या इमारतीतील हॉटेल लाखबंद करण्यात आले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आंदोलनही करण्यात आले होते. राणे यांच्याकडून थकबाकीची रक्कम वसूल करावी, अशी मागणीही करण्यात आली होती.

हेही वाचा >>> सागरी सुरक्षेच्या कामासाठीही ९५ पदांची कंत्राटी भरती; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागाचा शासन आदेश

दरम्यान, ३ कोटी ७७ लाख रुपयांची थकबाकी असताना राणे यांनी २५ लाख रुपयांचा धनादेश महापालिकेकडे जमा केला. त्यानंतर थकबाकीची रक्कम ‘शून्य’ करण्यात आली आहे. उर्वरित मालमत्तेच्या करासंदर्भात वाद सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राणे यांच्याप्रमाणे सर्वांना न्याय द्या

राणे यांनी थकीत रक्कम पूर्ण न भरता त्यांचा कर माफ करण्यात आल्यानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राणे यांना दिलेली सवलत सर्व थकबाकीदारांना द्यावी, अशी मागणी शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilesh rane paid 25 lakhs to pune municipal corporation to settle the tax dues pune print news apk 13 zws