नव्या सांगवीतील नाटय़गृहात आजपासून निळू फुले चित्रपट महोत्सव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतरही बंद अवस्थेत असलेले नव्या सांगवीतील निळूभाऊ फुले नाटय़गृह सुरू होण्यास मुहूर्त सापडला आहे. शुक्रवारपासून (१३ ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या निळू फुले चित्रपट महोत्सवाद्वारे हे नाटय़गृह सुरू होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात भरगच्च कार्यक्रम होणार असून ते रसिकांसाठी विनामूल्य आहेत.
महापौर नितीन काळजे यांनी ही माहिती दिली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (१३ ऑक्टोबर) सायंकाळी अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी निळूभाऊंच्या कन्या गार्गी, महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार उल्हास पवार, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, सुहासिनी देशपांडे, लीला गांधी आदी उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी दुपारी ‘एक गाव बारा भानगडी’, सायंकाळी ‘रंग एकपात्रींचे’ हा कार्यक्रम होणार आहे. वंदन नगरकर, दीपक रेगे, योगेश सुपेकर, दिलीप हल्याळ, भावना प्रसादे आदींचा त्यात सहभाग आहे. पं. उपेंद्र भट यांचा या समारंभात विशेष सत्कार होणार आहे. शनिवारी (१४ ऑक्टोबर) सकाळी अकरा वाजता ‘सामना’, दुपारी दोन वाजता ‘सिंहासन’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता ‘आठवणी निळूभाऊंच्या’ हा कार्यक्रम होणार आहे. ज्योती सुभाष, भालचंद्र कुलकर्णी, शांता तांबे, विलास रकटे, चेतन दळवी आदी सहभागी होणार आहेत. रविवारी (१५ ऑक्टोबर) सकाळी अकरा वाजता ‘पिंजरा’, दुपारी दोन वाजता ‘हऱ्या नाऱ्या झिंदाबाद’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. सायंकाळी समारोपास राजदत्त, सुषमा शिरोमणी, ज्योती चांदेकर, भारती गोसावी, जयमाला इनामदार, राघवेंद्र कडकोळ, वसंत अवसरीकर आदी सहभागी होणार आहेत. रात्री साडेनऊ वाजता ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे.