पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे उद्घाटनानंतरही नाटय़गृह बंदच

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोटय़वधी रुपये खर्च करून बांधलेले व बराच काळ रखडून राहिलेले नव्या सांगवीतील निळूभाऊ फुले नाटय़मंदिर उद्घाटनानंतरही बंदच ठेवण्यात आले आहे. मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या नाटय़गृहातील कामे अर्धवट आहेत. प्रशासकीय नियुक्तया झालेल्या नाहीत आणि ध्वनिक्षेपकाच्या रखडलेल्या कामामुळे नाटय़गृह सुरू होऊ शकलेले नाही. ढिसाळ नियोजनामुळे ही नामुष्की ओढवली आहे. या दिरंगाईमुळे सांस्कृतिक वर्तुळात नाराजीची भावना आहे.

नव्या सांगवीतील निळूभाऊ फुले नाटय़मंदिर सुरू होण्यास सुरुवातीपासून अनेक अडचणी आल्या आहेत. त्यातून मार्ग काढताना पालिकेचा तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचा बराच कालावधी गेला. त्यामुळे नाटय़गृह बांधण्यास उशीर झाला. नंतरही ते नाटय़गृह प्रत्यक्ष सुरू करण्यास बराच कालावधी जावा लागला. राजकीय श्रेयवादात अडकलेल्या या नाटय़गृहाची कामे पूर्ण झालेली नसतानाही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात उद्घाटनाचा कार्यक्रम अक्षरश: उरकून घेण्यात आला. चार महिन्यांपूर्वी भोसरी येथील नाटय़गृहात पालिकेच्या इतर विकासकामांमध्ये या नाटय़गृहाचे घाईने उद्घाटन करून घेण्यात आले. मात्र, त्यानंतरही खऱ्या अर्थाने नाटय़गृह सुरू झालेले नाही. त्याचे खरे कारण कोणालाही माहिती नाही.

नाटय़गृहाच्या उद्घाटनानिमित्त निळूभाऊ फुले चित्रपट महोत्सव घेण्यात आला. त्यानिमित्त सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत भरगच्च  कार्यक्रम घेण्यात आले. स्थानिक संस्थांच्या ‘दिवाळी पहाट’चे कार्यक्रमही झाले. नाटय़गृह उभारणीचे काम करणाऱ्या बी. जी. शिर्के कंपनीच्या वतीने काही कार्यक्रम झाले. त्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याने हे कार्यक्रम होऊ शकले. मात्र, त्यानंतर ‘जैसे थे’ परिस्थिती आहे. नाटय़गृह का बंद आहे, ते कधी सुरू होणार, याविषयी आयोजकांकडून सातत्याने विचारणा सुरू आहे. त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. प्रशासकीय नियुक्तया झालेल्या नाहीत, भाडेदर निश्चित व्हायचा आहे. नाटय़गृहासाठी आवश्यक ध्वनिक्षेपकाचे काम पूर्ण झालेले नाही, अशीच कारणे बऱ्याच दिवसांपासून दिली जात आहेत. भरपूर खर्च करण्यात आल्याने उत्तम सोयीसुविधा असलेले व आकर्षक वाटणारे नाटय़गृह म्हणून या नाटय़गृहाचे कौतुक होत असतानाच दुसऱ्या बाजूला कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही. त्यामुळेच वाजतगाजत झालेल्या उद्घाटनानंतरही हे नाटय़गृह बंदच आहे व ते कधी सुरू होणार, याची खात्रीशीर माहिती कोणालाही नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilu phule auditorium remain close after inauguration