घरकाम करणाऱ्या दोन महिलांनी संगनमत करून ज्येष्ठ दाम्पत्याची नजर चुकवून त्यांचे धनादेश पुस्तक चोरले. त्यांच्या बँक खात्यातून वेळोवेळी ९ लाख ४० हजार रूपये काढून फसवणूक केल्याची घटना उंड्री येथे घडली.
नीलम साहेबराव दाखले आणि मीनाक्षी लक्ष्मण दाखले (दोघीही रा. महमंदवाडी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. रोहित सिंग (वय ४४ रा. उंड्री) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी रोहित यांचे आई-वडिल उंड्रीत एकटेच राहायला आहेत. त्यामुळे घरकाम करण्यासाठी त्यांनी नीलम आणि मीनाक्षी यांना नेमले होते. मात्र, ज्येष्ठ दाम्पत्याची नजर चुकवून दोघींनी त्यांचे धनादेश पुस्तक चोरले. त्यावर रक्कम टाकून वेळोवेळी ९ लाख ४० हजार रूपये काढून फसवणूक केली. दरम्यान, काही दिवसांनी रोहित यांना आई-वडिलांच्या बँक खात्यातून मोठी रक्कम कमी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी चौकशी केली असता घरकाम करणाऱ्या दोघींचा प्रताप उघडकीस आला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते तपास करीत आहेत.