माथाडी कामगार नेते प्रकाश नारायण गोंधळे यांचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याप्रकरणी हिंदू राष्ट्रसेनेच्या नऊ जणांना न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि प्रत्येक २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा निकाल दिला.
हेही वाचा- लोणावळ्यातील वाहतूककोंडी सुटणार; आठ दिवसांत आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते विकी जाधव, वैभव भाडळे, अक्षय इंगुळकर, श्रीकांत आटोळे, अमोल शेगडे, राहुल कौले, विकी पाटील, सूरज फडके आणि आकाश शिंदे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. ८ जुलै २०१३ मध्ये गोंधळे यांचा खून झाला होता. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. जून २०१३ मध्ये गोंधळे यांच्या घरावर हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांनी गोंधळे यांच्या दरवाजावर पेट्रोल टाकून तो जाळला. तसेच घरात घुसत घरगुती वस्तुंचे नुकसान केले होते. या प्रकरणाची फिर्याद गोंधळे हडपसर पोलिस ठाण्यात दिली होती.
खुनाच्या घटनेच्या दिवशी रात्री अकराच्या सुमारास गोंधळे हे नेहमीप्रमाणे रेशनिंग दुकानातून घरी चालले होते. आरोपींनी त्यांना अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये गोंधळे यांचा मृत्यू झाला होता. याबाबत राजेंद्र पिंगळे यांनी फिर्याद दिली होती. निकाल देताना न्यायालयाने जम्नठेपेसह प्रत्येक गुन्हेगाराला २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाच्या रकमेतून एक लाख ५० हजार रुपये गोंधळे यांच्या कुटुंबीयांना द्यावे, असे आदेशात नमूद केले आहे.