लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: कर्नाटक राज्यातून गांजा विक्रीसाठी पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून नऊ किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. ७) सायंकाळी साडेचारच्या सुमारास करण्यात आली.
राहुल विठ्ठल जाधव (वय २२, रा. गुलबर्गा, कर्नाटक), शालिवान आप्पाराव वाडी (वय ३२, रा. गुलबर्गा, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार संदीप गवारी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आणखी वाचा- रिल्स बनवण्याच्या नादात दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला धडक; महिलेचा जागीच मृत्यू
थेरगाव येथील एका रुग्णालयासमोर दोघेजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून एक संशयित कार अडवली. कारची झडती घेतली असता त्यात दोन लाख ३१ हजार ५०० रुपयांचा नऊ किलो ३०० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी कारमधील राहुल आणि शालिवान या दोघांना ताब्यात घेत कार, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि गांजा असा एकूण सात लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.