पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील सोमवारी रात्री पसार झाल्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षकासह नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिला.
पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, हवालदार आदेश सीताराम शिवणकर, पोलीस नाईक नाथाराम काळे, शिपाई तिरप्पा बनसोडे, अमित जाधव, जनार्दन काळे, विशाल टोपले, स्वप्नील शिंदे, दिगंबर चंदनशिवे अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ शनिवारी (३० सप्टेंबर) रात्री दोन कोटी १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ललित पाटील याच्यासह सुभाष जानकी मंडल (वय २९, रा. देहूरोड, मूळ झारखंड) आणि रौफ रहिम शेख (वय १९, रा. ताडीवाला रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा >>>पिंपरीतील १०८ गणेश मंडळांना ‘आव्वाज’ भोवणार; पोलीस दाखल करणार खटले
ललित पाटीलला चाकण परिसरात मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी चाकण परिसरातून अटक करण्यात आली होती. कारागृहात असताना त्याची मंडल याच्याशी ओळख झाली होती. शेख ससून रुग्णालयातील उपाहारागृहात कामगार आहे. शेख याच्यामार्फत मंडल पाटीलला मेफेड्रोन पोहचविणार होता. पाटील जून २०२३ पासून ससून रुग्णालयात उपचार घेत होता. सोमवारी (२ ऑक्टोबर) सायंकाळी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन ससून रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक १६ मधून पसार झाला. कर्तव्य पार पाडताना बेफिकिरी दाखविल्याप्रकरणी नऊ जणांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले.
हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवड दौऱ्यानंतर शरद पवार गटात इनकमिंग सुरू; कार्यकर्त्यांची ताकद वाढवण्यासाठी लवकरच होणार मेळावा
ललित पाटीलचा शोध सुरू
पाटील ससून रुग्णालयातून सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास पसार झाला. बंदोबस्तावरील पोलिसांंना गुंगारा देऊन तो वाॅर्ड क्रमांक १६ मधून बाहेर पडला. पसार झालेल्या पाटीलचा माग काढण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. पुणे स्टेशन परिसरातून निघालेल्या पाटीलला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले आहे.