पुणे : एका नऊ वर्षांच्या मुलामुळे चौघांना जीवदान मिळाले आहे. मेंदुविकार झालेल्या या मुलाला मेंदुमृत घोषित करण्यात आल्याने त्याचे अवयवदान करण्यात आले. या मुलाची दोन्ही मूत्रपिंडे, स्वादुपिंड, यकृत आणि फुफ्फुसाचे प्रत्यारोपण शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांतील चार रुग्णांवर यशस्वीपणे करण्यात आले.
इनलॅक्स आणि बुधरानी रुग्णालयात या मुलाला ३ जुलैला दाखल करण्यात आले होते. त्याला ९ जुलैला मेंदुमृत घोषित करण्यात आले. मुलाच्या पालकांनी त्याच्या अवयवदानास संमती दिली. त्यामुळे त्या मुलाचे यकृत, दोन्ही मूत्रपिंडे, स्वादुपिंड आणि यकृत हे अवयव काढण्यात आले. त्यानंतर ग्रीन कॉरिडॉर करून शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी तातडीने हे अवयव पोहोचविण्यात आले.
हेही वाचा…पुणे : नवीन टर्मिनलवरून प्रवासी करताय? जाणून घ्या नवीन नियम अन्यथा होईल ५०० रुपयांपर्यंत दंड…
या मुलाचे यकृत रुबी हॉल क्लिनिकमधील ४७ वर्षीय पुरुषाला प्रत्यारोपित करण्यात आले. या रुग्णाला यकृताचा सिरोसिस झाला होता. त्याच्यावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, रुग्ण आता बरा होत आहे. मुलाचे एक मूत्रपिंड आणि स्वादुपिंड डेक्कनमधील सह्याद्री हॉस्पिटलमधील ४० वर्षीय पुरुषाला प्रत्यारोपित करण्यात आले. हा रुग्ण मूत्रपिंड आणि स्वादुपिंड विकाराने त्रस्त होता. प्रत्यारोपणानंतर त्याची तब्येत आता सुधारत आहे.
मुलाचे दुसरे मूत्रपिंड ज्युपिटर रुग्णालयातील ६४ वर्षीय पुरुषावर प्रत्यारोपित करण्यात आले. हा रुग्ण मूत्रपिंड विकाराने त्रस्त होता आणि गेल्या काही वर्षांपासून डायलिसिसवर होता. मुलाचे फुफ्फुस पिंपरी-चिंचवडमधील डीपीयू हॉस्पिटलमधील ६० वर्षीय महिलेवर प्रत्यारोपित करण्यात आले. पुणे विभागात यंदा आतापर्यंत ३६ मेंदुमृत अवयवदात्यांकडून अवयवदान करण्यात आले आहे.
हेही वाचा…दिवसाला सहा शेतकरी आत्महत्या, सहा महिन्यांत १२६७ शेतकऱ्यांनी जीवन संपवले
ज्युपिटरमध्ये ७२ तासांत ६ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ७२ तासांत ६ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. रुग्णालयात ७ ते १० जुलै या कालावधीत या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मेंदुमृत व्यक्ती आणि रुग्णांचे कुटुंबीय यांनी केलेल्या अवयवदानामुळे हे शक्य झाले आहे. यामुळे सहा जणांना जीवदान मिळू शकले आहे, अशी माहिती ज्युपिटर हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र पाटणकर यांनी दिली.