पर्यावरण, मानवी आरोग्याच्या रक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल; जून महिन्यापर्यंत सर्व गाडय़ांमध्ये सुविधा

पर्यावरणासह मानवी आरोग्याच्या रक्षणाच्या दृष्टीने पुणे रेल्वे विभागाने महत्त्वाचे पाऊल टाकले असून, विभागातील सर्वच गाडय़ांमध्ये जैव-शौचालयाची सुविधा देण्यात येत आहे. सद्य:स्थितीत ९० टक्के गाडय़ांमध्ये जैव-शौचालये बसविण्यात आली आहेत. येत्या जून महिन्यापर्यंत विभागातील सर्व गाडय़ांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पुणे रेल्वेकडून सांगण्यात आले.

रेल्वे गाडय़ांमध्ये जुनी, साध्या रचनेची शौचालये असल्याने लोहमार्गावर मानवी मैला जमा होऊन त्याचा पर्यावरणासह मानवी आरोग्यालाही अपाय होतो. अधिक कालावधीसाठी गाडय़ा थांबत असलेल्या स्थानकांवर ही समस्या अधिकच तीव्र होते. त्यातून स्थानकात आणि आवारातही मोठय़ा प्रमाणावर दरुगधी परसते. यावर उपाय म्हणून रेल्वे गाडय़ांमध्ये जुन्या शौचालयांऐवजी जैव-शौचालय उभारण्याची संकल्पना स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्रीय पातळीवर पुढे आली. त्यात सध्या पुणे विभागाने आघाडी घेतली आहे. सद्य:स्थितीमध्ये प्रामुख्याने झेलम, शताब्दी, आझाद हिंदू, पटना एक्स्प्रेस, अहमदाबाद दुरंतो, सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस, वेरावळ, गौरखपूर, मंडुआडीह, एर्नाकुलम, दरभंगा, लखनऊ, अमरामती आणि कोल्हापूरहून सुटणाऱ्या महाराष्ट्र, सह्यद्री, कोयना, धनबाद, नागपूर एक्स्प्रेस, मिरजहून सुटणाऱ्या काही गाडय़ांमध्ये जैव-शौचालयांची व्यवस्था उभारण्यात आली आहे.

पुणे विभागातील मिरज, कोल्हापूर, सांगली, सातारा रेल्वे स्थानकांवर गाडय़ा जास्त कालावधीसाठी थांबतात. या स्थानकांत लोहमार्गावर डब्यांमधून मानवी मैला पडत असल्याने मोठय़ा प्रमाणावर दरुगधीची समस्या होती. ती आता दूर होणार आहे. पुणे रेल्वे स्थानकावर जैव-शौचालयांची माहिती देण्यासाठी एक प्रतिकृतीही साकारण्यात आली आहे. त्यातून जैव-शौचालयाच्या रचनेची माहिती देण्यासह नागरिकांमध्ये जागृतीही करण्यात येत आहे.

जैव-शौचालय कशासाठी?

रेल्वे गाडय़ांमधील जुन्या शौचालयांमधून मानवी मैला थेट लोहमार्गावर पडून पर्यावरण आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. रेल्वेमध्ये सध्या बसविण्यात येत असलेल्या जैव-शौचालयामध्ये खालील बाजूला विशेष रचनेची टाकी बसविण्यात आली आहे. या टाकीमध्ये जिवाणूंची पैदास करण्यात येते. हे जिवाणू मानवी मैल्याचे रूपांतर पाण्यात करतात. त्याचप्रमाणे या पाण्याला क्लोरीनच्या मदतीने स्वच्छ केले जाते. त्यामुळे जैव-शौचालयातून मैल्याऐवजी हे प्रदूषणमुक्त पाणी लोहमार्गावर पडते. त्यामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्याची समस्या निर्माण होत नाही.

पुणे विभागातून धावणाऱ्या गाडय़ांमधील एक हजार डब्यांपैकी सध्या ८०० डब्यांमध्ये जैव-शौचालयाची सुविधा देण्यात आली आहे. उर्वरित २०० डब्यांमध्ये जैव-शौचालय बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. येत्या जून महिन्यांपर्यंत सर्वच गाडय़ांमध्ये जैव-शौचालय बसविण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यात येणार आहे.

– मिलिंद देऊस्कर, पुणे रेल्वे व्यवस्थापक

Story img Loader