लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : महायुतीच्या विरोधात लढा देणाऱ्या ‘निर्भय बनो’ या जनआंदोलनाने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहीरनाम्यात ‘निर्भय बनो’ च्या मुद्द्यांचा समावेश करावा, अशी मागणी महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या तीनही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे करण्यात आली आहे.

दहा वर्षांपूर्वी २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सतेत आलेल्या राजवटीच्या काळात ‘लोकशाही आणि भारतीय संविधानाचे संरक्षण’ करण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्या पुढाकारातून ‘निर्भय बनो’ ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून २०२३-२४ या काळात महाराष्ट्रातील विविध भागांत ७५ जाहीर सभा घेण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रपक्षांच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी होण्यात त्यांची मदत झाली, हे आघाडीतील नेत्यांनीदेखील मान्य केलेले आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने लोकशाही आणि संविधान मानणाऱ्या सर्वच पक्षांना आमचा पाठिंबा राहणार आहे, असे ‘निर्भय बनो’चे समन्वयक उत्पल व. बा. यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा-सोसायटीतील गणेशोत्सवात महिलांचा विनयभंग, लोणीकंद पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

आगामी विधानसभा निवडणुकीत नागरिकांच्या हिताचे मुद्दे, पाणी-शिक्षण-आरोग्य-शेती-रोजगार-महिला व बालकल्याण अशा विषयांवरील महत्त्वाचे प्रश्न ‘निर्भय बनो’च्या व्यासपीठावरून मांडण्यात येणार आहेत. यासाठी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात ‘निर्भय बनो’च्या काही मुद्द्यांचा समावेश करावा, असे पत्र जनआंदोलनाचे समन्वयक उत्पल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठविले आहे. महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोेले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्याचे उत्पल यांनी सांगितले.

जाहीरनाम्यात कोणत्या मुद्द्यांचा समावेश असावा हे ठरविण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुखांबरोबर एकत्रित आणि सविस्तर चर्चा करून निश्चित धोरण ठरविण्याची गरज आहे. त्यासाठी पुढाकार घेऊन तीनही पक्षांच्या वरिष्ठांबरोबर बैठक घेण्याचे निश्चित करावे, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nirbhay bano supports mahavikas aghadi and demands inclusion of issues in manifesto pune print news ccm 82 mrj