पुणे शहरातील कसबा पेठ भागात असलेल्या पुण्येश्वर मंदीर परिसरातील अतिक्रमण हटविण्यात यावे, या मागणीसाठी पुण्येश्वर पुनर्निर्माण समितीच्या वतीने पुणे महापालिकेच्या बाहेर भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली काल आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनादरम्यान आमदार नितेश राणे आणि आमदार महेश लांडगे या दोन्ही नेत्यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याबद्दल एकेरी उल्लेख आणि वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली होती. त्या विधानाच्या निषेधार्थ आज पुणे महापालिकेमध्ये अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने काळ्या फिती बांधून आंदोलन केले.
पुणे महापालिका नगर अभियंता प्रशांत वाघमारे, अतिक्रमण प्रमुख माधव जगताप यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी प्रशांत वाघमारे म्हणाले की, पुण्येश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमणाबाबत काल काही संघटनांनी आंदोलन केले. हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. पण काल आंदोलनादरम्यान अधिकार्यांबद्दल जी भाषा वापरली गेली आहे, ती योग्य नसून या शहरामध्ये आम्ही अनेक वर्षांपासून अधिकारी म्हणून काम करित आहोत, एका रात्रीमध्ये शहरात विकास झाला नाही, तर अनेक वर्षे काम केल्यानंतर शहर प्रगती पथावर गेले आहे. त्यामुळे अधिकारी असो वा अन्य कर्मचारी या कोणत्याही व्यक्तींबद्दल योग्य भाषा वापरली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा – अजितदादा आणि चंद्रकांतदादांच्या शीतयुद्धात पुण्यातील ४०० कोटींची कामे रखडली !
हेही वाचा – देशात पुण्याची आघाडी! पहिल्या सहामाहीत घरांच्या विक्रीत गाठला मोठा टप्पा
पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह संबधित अधिकारी वर्गासोबत पुण्येश्वर मंदिराबाबत बैठक आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.