पुण्यातील सिंहगड रस्ता उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात नितीन गडकरींनी अनेक विषयांवर त्यांच्या मिश्किल स्टाईलमध्ये टोलेबाजी केली. यावेळी मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे आणि पुण्यासाठी बिन पैशांची मेट्रो अशा प्रकल्पांचा उल्लेख करताना नितीन गडकरी यांनी मारलेल्या शेऱ्यांमुळे समोर उपस्थित असलेल्या लोकांसोबतच व्यासपीठावरील मान्यवरांमध्ये देखील हशा पिकला. यावेळी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे च्या बांधकामासाठी निधी पुरवण्याचा मुद्दा येताच नितीन गडकरींनी “माझ्याकडे पैशांची कमी नाही आणि मी कोणत्या अर्थमंत्र्यांकडे पैसे मागायलाही जात नाही”, असा टोला लगावला!
नरीमन पॉइंट ते दिल्ली १२ तासांत
यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी दिल्ली ते मुबई एक्स्प्रेस वे च्या कामाचा उल्लेख केला. दोनच दिवसांपूर्वी गडकरींनी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्याविषयी त्यांनी यावेळी सांगितलं. “अजित दादा, मी आता दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे बांधतोय. परवा मी त्याचं काम पाहिलं. एका ठिकाणी तो १२ लेन आहे. त्यावर १७० किमी स्पीडच्या गाडीत बसलो होतो. पण पोटातलं पाणी हललं नाही. त्याचं ७० टक्के काम झालं आहे. फक्त महाराष्ट्रातलं काम राहिलंय. या हायवेला मी जेएनपीटीपर्यंत नेणार आहे. माझी इच्छा होती की वसई-विरारपासून वरळी बांद्र्यापर्यंत हा मार्ग जोडला तर नरीमन पॉइंटवरून थेट दिल्लीला १२ तासांत पोहोचता येईल”, असं ते म्हणाले.
वरळी-वांद्र्याशी भावनिक नातं
“माझं वरळी-वांद्र्याशी भावनात्मक नातं आहे. या कामासाठी ६०-७० हजार कोटी लागले, तरी मी एक असा मंत्री आहे की ज्याच्याकडे पैशांची काही कमी नाही. आणि मी कोणत्या अर्थमंत्र्यांकडे पैसे मागायलाही जात नाही. त्यामुळे पैसा कसा उभा करायचा ही समस्या नाही. हाही बांधायला मी तयार आहे. फक्त त्याबाबत तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून धोरणात्मक काही निर्णय झाला, तर दिल्लीला नरीमन पॉइंटशी थेट जोडून देण्याच काम मी करून देईन”, असं गडकरी म्हणाले.