देशामध्ये मोदी लाट आहे हा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे. पण, मोदी लाट आहे या भ्रमात राहू नका, अशा शब्दांत सावध करीत तीन महिन्यांत संपूर्ण ताकद पणाला लावून विधानसभेवर पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे या निर्धाराने काम करा, असा आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी पक्ष कार्यकर्त्यांना दिला. केंद्रात सत्ता आल्यामुळे आता आपण नायकाच्या भूमिकेत आलो आहोत. राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी विकासाची गंगा सामान्यांपर्यंत न्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार गिरीश बापट यांच्या कार्यअहवालाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. भाजपचे राष्ट्रीय सचिव श्याम जाजू, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, भीमराव तापकीर, चंद्रकांत मोकाटे, प्रदेश चिटणीस योगेश गोगावले, शिवसेना शहरप्रमुख अजय भोसले, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे या वेळी उपस्थित होते.
आपला कार्यअहवाल जनतेला सादर केला पाहिजे ही शिकवण रामभाऊ म्हाळगी यांनी दिली. तोच कित्ता बापट सातत्याने गिरवीत आहेत. जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी असे अनेक बापट निर्माण झाले पाहिजेत, ही अपेक्षा व्यक्त करून गडकरी म्हणाले, आपल्या गुणसुत्रांमध्ये विरोधी पक्षाचे गुणधर्म आहेत. मात्र, आता आपली भूमिका बदलली आहे. त्यानुसार आपली विचार आणि कार्यपद्धतीदेखील बदलायला हवी. सुखी, समृद्ध, भय आणि भ्रष्टाचारमुक्त भारत घडवायचा आहे.
माझ्या बालपणी सुंदर असलेले पुणे आता प्रदूषण आणि वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध झाले आहे. राज्यात सत्तेवर आल्यानंतर पुढील ५० वर्षांचा विचार करून शिरोळे आणि बापट यांनी पुण्याचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करावे, अशी सूचना गडकरी यांनी केली. पूर्वी पुण्याचे अनुकरण नागपूरकर करायचे. आता महापालिकेत आमचे ७८ सभासद आहेत. पुण्यात मात्र ही संख्या २५ च्या वर जात नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.  
सामान्य माणूस केंद्रिबदू मानून त्याची सेवा करण्याचे काम केल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले.

Story img Loader