पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेला गर्दी न जमल्याने भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला गर्दी व्हावी, यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे. मोदी यांच्या सभेला गर्दी जमविण्याची जबाबदारी खासदार, आमदारांसह शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील विविध विकासकामांचा उद्घाटन समारंभ कर्वेनगर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती अल्प होती. त्याची दखल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या सभेला गर्दी व्हावी, यासाठी भाजपकडून दक्षता घेण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून बैठका घेऊन दररोज आढावा घेण्यात येत आहे. तसेच राज्य आणि शहर पातळीवरील वरिष्ठ नेतेही तयारीवर लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा >>>विधानसभेचे पूर्वरंग: आरक्षणावरून असंतोष की ‘लाडकी बहीण’?

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (२६ सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर येत असून, शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्रो मार्गाच्या उद्घाटनानंतर त्यांची स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने तयारी केली आहे. पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या सभेसाठी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती असावी, यासाठी भाजपच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. शहरातील विविध भागांतून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून बस तसेच वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी खासदार, आमदारांपासून ते वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

विधानसभेसाठी इच्छुकांकडून नियोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी अधिकाधिक संख्येने आपल्या भागातील नागरिकांना सभेला आणण्याचे नियोजन विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. यासाठी आपापल्या भागातील नागरिकांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर मेसेज पाठवून उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. सभेच्या ठिकाणी जाण्यासाठी बस तसेच वाहनाची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांकडून त्यांची नावे, मोबाइल क्रमांक तसेच संख्या नोंदवून घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.

पंतप्रधानांचा भुयारीमेट्रोने प्रवास

शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी भुयारी मेट्रो मार्गाने थेट स्वारगेटपर्यंत प्रवास करणार आहेत. तेथून स. प. महाविद्यालयाच्या मैदानावरील जाहीर सभेला जाणार आहेत.

मोदींच्या सभेवर पावसाचे सावट?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आहे. पण, मंगळवारी झालेल्या पावसामुळे मैदानावर चिखल झाला आहे. चिखल झालेल्या ठिकाणी मुरूम टाकला जात आहे. पुढील दोन दिवस, म्हणजे बुधवारी, गुरुवारीही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे त्याचा गर्दीवर परिणाम होण्याची शक्यता असून, सभास्थळी चिखल होऊ न देण्याचे आव्हानही पेलावे लागणार आहे.