पुणे : ‘ही निवडणूक नागरिकांच्या भविष्याचा निर्णय करणारी आहे. देशाच्या विकास आणि प्रगतीसाठी पैशांची नव्हे तर, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांची कमतरता आहे. ती दूर करण्यासाठी महायुतीच्या डबल इंजिन सरकारला पुन्हा निवडून द्या,’ असे आवाहन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.
भारतीय जनता पक्ष महायुतीचे कोथरूडमधील उमेदवार, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ कर्वे पुतळ्याजवळ झालेल्या सभेत गडकरी बोलत होते. खासदार मेधा कुलकर्णी, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, राष्ट्रवादीचे (अजित पवार) शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह रिपाइं, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, ‘ज्या गावचा राजा व्यापारी त्या गावची प्रजा भिकारी, अशी एक ग्रामीण म्हण आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात त्याचे प्रत्यंतर आले. ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष, सिंचनाच्या सुविधांचा अभाव होता. या देशात पाण्याची नाही, तर पाण्याच्या नियोजनाची कमतरता आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर नदीजोड प्रकल्पातून थेट समुद्रात जाणारे पाणी रोखण्यात आले. राज्य पाण्याने समृद्ध करण्यात आली. पाण्यावरून राज्याराज्यांत होणारी भांडणे मिटविण्याचा यशस्वी प्रयत्न भाजपने केला.’
‘काँग्रेस राजवटीमध्ये चुकीची आर्थिक धोरणे आणि भ्रष्टाचाराने देशाची वाट लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योग्य धोरणांमुळे मात्र परिस्थिती बदलली आहे. ऑटोमोबाइल क्षेत्राची उलाढाल २२ लाख कोटींपर्यंत वाढली असून ती जगातील तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. पुढील पाच वर्षांत या क्षेत्रात चीनला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर असेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. देश सुखी, संपन्न आणि समृद्ध आणि विश्वगुरू झाला पाहिजे ही भाजपची इच्छा आहे. योग्य नीती, योग्य व्यक्ती आणि योग्य पक्ष असेल तर हेच साध्य होणार आहे,’ असे ते म्हणाले.
हेही वाचा – Bhosari Assembly Constituency :मतांसाठी धर्मयुध्द करा; देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी केंद्राने ५४ हजार कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत. पुण्यातील वाढते प्रदूषण रोखण्याची आवश्यकता असून, येत्या काळात एक लाख कोटींची विकासकामे होतील. देशाची प्रगती आणि विकासाला पैशांची नव्हे तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची कमतरता आहे. राज्यात डबल इंजिनचे सरकार आले तर विकासाचा वेगही दुप्पट होईल,’ असा दावा गडकरी यांनी केला.