पुणे : जैवइंधनातील प्रगतीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. यातून गावे सशक्त होणार असून, ग्रामीण भागातून शहरात स्थलांतर करण्याचे प्रमाण कमी होईल. देशात हरित क्रांतीत एम.एस.स्वामिनाथन यांचे योगदान मोठे होते. आता कृषी क्षेत्रात जैवइंधन क्रांती सुरू असून, त्यात डॉ. प्रमोद चौधरी यांनी मोठे योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी काढले.
प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात गडकरी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भाषण केले. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सिम्बायोयिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया, पर्सिस्टंट सिस्टिम्सचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे, प्राजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशीपुरा आणि अध्यक्ष अतुल मुळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>> कार्ला गडावर जात आहात ? …रज्जू- मार्गाने जा
गडकरी म्हणाले की, जैवइंधनाच्या माध्यमातून मोठे सामाजिक-आर्थिक स्थित्यंतर होणार आहे. जैवइंधन विकसित करण्यात प्रमोद चौधरी यांच्या संशोधनाचा मोलाचा वाटा आहे. जैवइंधनाचा कृषी अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. इथेनॉल निर्मितीमुळे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपण वाटचाल करणार आहोत. भविष्यात खनिज तेलाची आयात कमी करून आपण आत्मनिर्भर बनण्यात यशस्वी होऊ. आगामी काळात चौधरी यांनी जैवइंधन क्षेत्रात असेच सकारात्मकरीत्या कार्यरत राहावे आणि देशाला मार्गदर्शन करावे.
हेही वाचा >>> पेट्रोलऐवजी बायोइथेनॉलवर वाहने धावणार! देशात पुढील ६ महिन्यांत होणाऱ्या मोठ्या बदलाची गडकरींची माहिती
यावेळी बोलताना डॉ. माशेलकर, डॉ. मुजुमदार आणि डॉ. फिरोदिया यांनी डॉ. चौधरी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखविले. आनंद देशपांडे यांनी चौधरी यांच्या सुरुवातीच्या टप्प्यातील कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. कार्यक्रमात राज्यातील साखर उद्योगाच्या वतीने श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने चौधरी यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जोशीपुरा यांनी केले तर आभार मुळे यांनी मानले.
जैवअर्थव्यवस्थेचे अवकाश खुले होतेय…
सत्काराला उत्तर देताना डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले की, आताशी कुठे जैवअर्थव्यवस्था खुली होत आहे. या क्षेत्रासमोर खुले अवकाश आहे. संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून विविध गोष्टींवर काम करता येईल. या क्षेत्रातील नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करताना प्राजमधील बुद्धिमान सहकाऱ्यांनी मला पाठबळ दिले. त्याचे एकत्रित फलित आता प्राजच्या रूपाने पाहायला मिळत आहे.