Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) हे आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी पुण्यात केलेले एक विधान चांगलंच गाजतं आहे. त्यांनी केलेल्या त्या विधानाचे वेगवेगळे अर्थही राजकीय वर्तुळात लावले जात आहेत. लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा जर कोणती असेल तर राजाच्या विरुद्ध कितीही प्रखरपणे जर कुणी विचार मांडले तर राजाने ते सहन केलं पाहिजे. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यातील राजा कोण आणि प्रखर मत मांडणारे कोण याबाबतही वेगवेगळे तर्क काढले जात आहेत.
सेक्युलर शब्दाचा धर्मनिरपेक्षता नाही
सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता असा घेतला जातो. मात्र त्या शब्दाचा अर्थ हा सर्वधर्मसमभाव आहे असं नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) म्हणाले. स्वामी विवेकानंदांनी शिकागोत जे विचारले ते महत्त्वाचे आहेत. माझा धर्म श्रेष्ठ हे सांगायला मी आलो नाही, माझा परमेश्वर श्रेष्ठ आहे हे सांगायला मी आलो नाही. तर तुमचा धर्म आणि तुम्ही जो परमेश्वर मानता तो श्रेष्ठ आहे हे सांगायला मी आलो आहे. आपली भारतीय संस्कृती आणि इतिहास ही आपल्याला मिळालेली देणगी आहे. सहिष्णुता हे आपलं वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वरांनी पसायदानात सांगितलं आहे की विश्वाचं कल्याण झालं पाहिजे. आपण कधीही म्हटलेलं नाही माझं कल्याण होवो, विश्वाचं कल्याण होवो. दुसऱ्याच्या भविष्याबद्दल भावना व्यक्त करणं ही आपल्या संस्कृतीची विशेषता आहे. कुठल्याही धर्माची मूलभूत तत्त्व आहेत ती सारखीच आहेत. असं नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) म्हणाले.
हे पण वाचा- Nitin Gadkari: नितीन गडकरींची राजकारणातील घराणेशाहीवर टीका; म्हणाले…
राजाच्या विरोधात कुणी कितीही प्रखर विचार मांडले तरीही..
“लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा जर कोणती असेल तर राजाच्या विरुद्ध कितीही प्रखरपणे जर कुणी विचार मांडले तरीही राजाने ते सहन केले पाहिजे. त्या विचारांवर चिंतन केले पाहिजे. हीच खरी लोकशाहीमध्ये अपेक्षा आहे. माझी आई मला नेहमी सांगायची की निंदकाचे घर असावे शेजारी. आपल्याला दिशा देणारा आहे तो निंदा करणारा माणूस असतो. आपण जगातली सर्वात मोठी लोकशाही आहोत. लोकशाही चार स्तंभावर उभी आहे. या चारही स्तंभांचे अधिकार संविधानात आहेत. जे समाजाच्या हितासाठी आहे, देशहितासाठी आहे त्याप्रमाणे ते मांडण्याचं स्वातंंत्र्य आपल्याला संविधानाने दिलं आहे.” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुणे येथे संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि माजी कुलगुरू डॉ एस एन पठाण यांच्या अमृत महोत्सवी गौरव ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहाता याचे वेगवेळे अर्थ काढले जात आहेत. गडकरी ( Nitin Gadkari ) हे प्रसंगी स्वतःच्या पक्षावर, पक्ष नेतृत्वावर आणि राजकीय स्थितीवर मनमोकळे भाष्य करण्याविषयी जाणले जातात.
कुठलाही माणूस धर्म, भाषा, प्रांतामुळे मोठा होत नाही-गडकरी
कुठलाही व्यक्ती हा धर्म, भाषा, प्रांत यामुळे मोठा होत नाही तर तो त्याच्या कर्तृत्वाने मोठा होतो असंही नितीन गडकरी म्हणाले. अंधारातलं वर्तन हे माणसाचं चरित्र आहे असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. डॉ. पठाण यांना अडचणी आल्या असतील कारण त्यांनी परखडपणे त्यांनी विचार मांडले आहेत. स्वधर्म आणि अन्य धर्मातली टीका त्यांनी सहन केली असेल. पण त्याची चिंता न करता त्या विषयाबद्दल कटिबद्धता ठेवून त्यांनी सातत्याने विचार कायम ठेवला. राजकारणात जे होतं तसं आता झालं आहे पानी तेरा रंग कैसा जिसमें मिला हो वैसा असं झालं आहे. आपल्या देशात विचारभिन्नता ही समस्या नाही विचारशून्यता ही समस्या आहे. असंही गडकरी ( Nitin Gadkari ) म्हणाले.