पुणे : राज्य परीक्षा परिषदेने राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षेअंतर्गत (एनएमएमएस) शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली. जिल्हा, शाळा आणि विद्यार्थ्यांना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर निवड यादी उपलब्ध असून, विद्यार्थ्यांचे गुणपत्रक शाळेच्या ऑनलाइन खात्यात उपलब्ध करून देण्यात येईल.
परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य परीक्षा परिषदेतर्फे २१ डिसेंबरला ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर १० फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. तसेच विद्यार्थी, पालकांना दुरुस्ती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते.
ऑनलाइन पद्धतीने आलेल्या दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. या परीक्षेसाठी सातवी आणि आठवीची विद्यार्थीसंख्या, बारा ते चौदा वयोगटातील संख्येच्या आधारे जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार निवड यादी आणि गुण यादी राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एनएमएमएस शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना दरवर्षी बारा हजार रुपये दिले जातात.