लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : अनधिकृत फलकांवर कारवाईचा आदेश असूनही राजकीय नेत्यांच्या दबावापोटी महापालिका कारवाई करताना अडखळत असल्याचे चित्र सध्या पुण्यात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अक्षरश: गल्लीबोळांत सर्वपक्षीय ‘इच्छुकां’ची गर्दी वाढल्याने चौकाचौकांत फलकांचीही दाटी होऊ लागली आहे. याच्या परिणामी शहराचे मात्र विद्रुपीकरण झाले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी शहरात अनेक बेकायदा जाहिरात फलक लावले आहेत. यावर कारवाई करून हे फलक तातडीने काढून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले होते. मात्र, नेत्यांच्या दबावामुळे यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

आणखी वाचा-पिंपरी : राज्याच्या तिजोरीत खडखडाट? अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, ‘राज्याची आर्थिक’…

शहरातील विविध रस्त्यांवर तसेच महत्त्वाच्या चौकांमध्ये मोठ्या आकारातील फलक लावण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. इच्छुकांकडून सण, उत्सवांच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम, वस्तू वाटप, मिरवणुका आदी कार्यक्रमांची जाहिरातबाजी या फलकांवर होत आहे. चौकाचौकांमध्ये लावण्यात आलेल्या या जाहिरात फलकांमुळे काही ठिकाणी वाहतुकीचे नियंत्रण करणारे दिवे झाकले गेले आहेत, तर काही रस्त्यांवरील दिशादर्शक फलक झाकले गेले आहेत. शहरभर झळकणाऱ्या या अनधिकृत फलकांमुळे पदपथावरून चालणाऱ्या नागरिकांसह वाहनचालकांना त्रास होत आहे.

शहरातील जंगली महाराज रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, डेक्कन जिमखाना परिसरासह मध्यवर्ती पेठांतील अनेक चौकांमध्ये आणि रस्त्यांवर हे बेकायदा जाहिरात फलक लावण्यात आल्याने शहर अक्षरश: विद्रूप दिसते आहे. हे फलक लावताना महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असते. त्यामधून पालिकेला उत्पन्न मिळते. मात्र, सध्या शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर लावण्यात आलेल्या या फलकांसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा-जन्म-मृत्यू नोंदणीसाठी नागरिकांना हेलपाटे, हे आहे कारण!

या अनधिकृत फलकांच्या अनेक तक्रारी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. याची दखल घेऊन आयुक्त भोसले यांनी पालिकेच्या आकाशचिन्ह विभागासह अतिक्रमण विभागाला चौकाचौकांमध्ये लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांवर कारवाई करून ते काढून टाका, असे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे समोर आले आहे. आयुक्तांच्या आदेशानंतरही हे बेकायदा जाहिरात फलक तसेच उभे असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पक्षांचा दबाव?

काही जाहिरात फलकांचा आकार महापालिकेने घातलेल्या मर्यादेपेक्षा अधिक मोठा आहे. जंगली महाराज रस्त्यासह, डेक्कन परिसरात हे फलक लावण्यात आलेले आहेत. हे फलक सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे असल्याने त्यावर कारवाई होऊ नये, यासाठी सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी दबाब टाकत असल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे.