‘ साखर कारखान्यांनी ठिबक सिंचनासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यातील पाण्याची उपलब्धता पाहता पुढील काळात उसाला ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही.’ असे मत केंद्रीय कृषिमंत्री आणि ‘वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट’चे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ते रविवारी बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार, संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी पाटील, महासंचालक शिवाजी देशमुख, साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील आदी या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘शेतीसाठी दिल्या जाणाऱ्या पाण्यापैकी साठ टक्के पाणी केवळ उसासाठी लागते. मात्र दुष्काळी परिस्थितीत राज्यातील पाण्याची उपलब्धता पाहता उसाला ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही. या वर्षी ऊस उत्पादनाचा सर्वाधिक फटका सोलापूर जिल्ह्य़ाला बसणार आहे. उजनी धरण कोरडे पडल्याने पुढील हंगामात उसाचे गाळप फारसे होणार नाही. ऊस लागवडीसाठी बियाणे उपलब्ध करून देण्याचा प्रश्नही मोठा आहे. राज्याच्या ज्या भागांत पाणी उपलब्ध आहे तेथील कारखान्यांनी मदतीसाठी पुढे यावे.’’
यंदा उसाचे गाळप ७६० लाख टन झाले आहे. पुढील हंगामात ते ४०० ते ४५० लाख टन होईल, असा अंदाज या बैठकीत वर्तवण्यात आला.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा