संशोधनच होत नसल्याचे वास्तव उघड; पुढील वर्षी पारितोषिकाची व्याप्ती वाढविण्यावर भर देणार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘मराठी नाटक आणि रंगभूमी’ या विषयांमधील संशोधनासाठी दिल्या जाणाऱ्या ‘नाटय़ाचार्य खाडिलकर’ पारितोषिकासाठी यंदा एकही अर्ज आला नसल्याची माहिती समोर आली आहे. पारितोषिकासाठी अर्ज करण्याबाबत विद्यापीठाकडून मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, मराठी भाषा आणि संस्कृतीच्या अभ्यास आणि संशोधनासाठी स्थापना झालेल्या विद्यापीठातील मराठी नाटक या विषयातील संशोधन होत नसल्याचे वास्तव उघड झाले आहे.
नाटय़ाचार्य खाडिलकर पारितोषिकाचे स्वरूप रोख रक्कम आणि संशोधनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ग्रंथांच्या खरेदीसाठीची रक्कम असे असते. त्या अनुषंगाने विद्यापीठ स्तरावर मराठी नाटक आणि रंगभूमी या विषयात पीएच.डी. प्रबंध सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते. त्या बाबतचे परिपत्रक विद्यापीठाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते. त्यात अर्ज करण्यासाठी २६ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र, त्या मुदतीत एकही अर्ज न आल्याने विद्यापीठाने मुदतवाढ देऊन ७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले. त्यानंतरही या पारितोषिकासाठी एकही अर्ज आला नाही. गेल्या वर्षी हे पारितोषिक देण्यात आले होते. पारितोषिकासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. यंदा एकही अर्ज न आल्याने पारितोषिक देण्यात येणार नाही,’ असे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव डॉ. उत्तम चव्हाण यांनी सांगितले.
पारितोषिक पीएच.डी. पुरते मर्यादित राहू नये
मराठी भाषेअंतर्गत मराठी नाटक या विषयावरील पीएच.डी. संशोधनासाठीचे हे पारितोषिक आहे. त्यामुळे हे संशोधन मराठी विभागातून असू शकते किंवा ललित कला केंद्रातून असू शकते. नाटकासंदर्भात होणारे संशोधन हे मराठी नाटकाविषयीच असते असे नाही. पारितोषिकासाठीच्या नियमांतच मराठी नाटक आणि रंगभूमी असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. मात्र बदलत्या काळात हे पारितोषिक केवळ पीएच.डी. संशोधनापुरते मर्यादित न ठेवता मराठी रंगभूमीविषयी संशोधन करून निबंध लिहिणाऱ्या, भाषण देणाऱ्यांनाही खुले करता येऊ शकेल किंवा अन्य विद्यापीठातील संशोधकांनाही देण्याचा विचार करायला हरकत नाही. त्यामुळे मराठी नाटकाविषयीच्या संशोधनाला चालना मिळू शकेल, असे ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांनी सांगितले.
पुरस्कार कधी ठेवण्यात आला, त्या वेळची भूमिका लक्षात घेऊन आणि सध्याचा बदलत्या कालखंडात पारितोषिकाची व्याप्ती वाढवण्यासाठी काय करता येईल, याचा विचार नक्कीच केला जाईल.
– डॉ. एन. एस. उमराणी, प्र कुलगुरू