अनाथ बालकांचे पारपत्र काढण्याच्या पक्रियेतील जन्माच्या दाखल्याची अट शिथिल करण्यात आली आहे. बाहेरील देशात दत्तक जाणाऱ्या अनाथ बालकांच्या पात्रपत्रासाठी येणाऱ्या अडचणी यामुळे कमी होऊ शकतील. प्रादेशिक पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी ही माहिती कळवली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने फेब्रुवारी १९८९ मध्ये काढलेल्या एका परिपत्रकानुसार २६ जानेवारी १९८९ या दिवशी किंवा त्यानंतर ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना पारपत्रासाठी जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला जोडावा लागतो. या तरतुदीचा समावेश पारपत्र नियमावलीतही करण्यात आला. नजिकच्या भूतकाळात देशातील विविध अनाथालयांकडून अनाथ बालकांचे पारपत्र काढताना येत असणाऱ्या अडचणी मंत्रालयासमोर आल्या होत्या. अनाथ बालकांच्या मूळ आई-वडिलांची नावे ज्ञात नसतात, तसेच त्यांच्या जन्माची नेमकी तारीखही माहीत नसते, असा मुद्दा मांडण्यात आला होता. आता २६ जानेवारी १९८९ रोजी किंवा नंतर जन्मलेल्या अनाथ बालकांसाठी ही अट शिथिल करण्यात आली असून त्यांच्या जन्माचा दाखला उपलब्ध नसल्यास त्यांना पर्यायी कागदपत्रे सादर करण्याची मुभा असणार आहे.

Story img Loader