सन २०१२ मध्ये महापालिका निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. पुण्याचा केवळ भौतिक विकास न करता शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास करण्यात आला असून पक्षातर्फे महापालिकेचा कारभार चालविताना गेल्या पाच वर्षांत एक रुपायाचाही भ्रष्टाचार झाला नाही किंवा भ्रष्टाचाराचा आरोप पाच वर्षांतील महापौर आणि स्थायी समितीच्या अध्यक्षांवर झालेला नाही, असा दावा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केला. शिक्षण मंडळ हे पालिकेचा भाग आहे असे मी मानत नाही, असेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, आमदार जयदेव गायकवाड, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक शंकर केमसे, अ‍ॅड. म. वि. अकोलकर या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले,की पक्षातर्फे महापालिकेचा कारभार करताना कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही. शिक्षण मंडळ हे काही महापालिकेचा भाग आहे, असे मी मानत नाही. शिक्षण मंडळात भ्रष्टाचार आणि अंमलबजावणीत कसूर होत असल्याने ते बरखास्त करण्यात यावे, अशी शिफारस राज्य शासनाकडे आम्ही केली होती.

मात्र, विनोद तावडे यांनी त्यावर स्थगिती आणली आहे.

सन २०१२ साली महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या जाहीरनाम्यातील ८५ टक्के कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. दोनशे वीस किलोमीटर रस्त्याचे क्राँक्रीटीकरण करण्यात आले आहे. शहराच्या विकासासाठी स्वयंसेवी संस्था, उद्योजकांचे सहकार्य घेऊन विकास करण्यात आला आहे, असेही पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याचे घोषवाक्य -‘एक दशक प्रगतीचे पुढील दशक समृद्धीचे’

जाहीरनाम्यातील ठळक घोषणा

सन २०२० पर्यंत पुणे शहर डिजिटल साक्षर करणार

चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी स्टार्क ही नवी प्रणाली आणणार

* केरळ येथील यशस्वी छोटय़ा कचरा प्रकल्पांप्रमाणेच पुण्यात प्रकल्प राबवणार

* स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार

* पु. ल. देशपांडे उद्यान ते फनटाईम चित्रपटगृह असा साडेसात किलोमीटर अंतराचा कॅनॉल रस्ता बांधणार

* र्सवकष संस्कृती जतन आराखडा आखून सर्व ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणार

* पुनवडी ते ग्लोबल पुणे हा प्रवास सांगणारे थीम पार्क उभारणार

भाडेतत्त्वावर सायकल योजना सुरू करणार

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No corruption in municipal corruption in last five years says ajit pawar