केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याविरुद्ध एकही गुन्हा दाखल नसल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिल्लीला पाठवली आहे. पोलीस संरक्षण पुरविण्यात आलेल्या व्यक्तींची माहिती सर्वोच्च न्यायालयाला सादर करण्यासाठी ही माहिती दिल्ली पोलिसांनी मागवली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
पवार यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्य़ाची माहिती तत्काळ शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्याचे आदेश पुणे पोलिसांच्या सोमवारच्या गॅझेटद्वारे देण्यात आले आली. ही माहिती मंगळवापर्यंत (१२ मार्च) पाठवावी, असे त्या गॅझेटमध्ये म्हटले होते. याबाबत बुधवारी पुणे पोलिसांनी एक निवेदन प्रसिद्धिस दिले. यामध्ये असे म्हटले आहे की, संरक्षित व्यक्तींना पुरविण्यात येणाऱ्या संरक्षणासंदर्भाची माहिती सर्वोच्च न्यायालयास सादर करायची असल्याने दिल्ली पोलिसांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याविरूद्ध दाखल गुन्ह्य़ांची माहिती पुणे पोलिसांकडे मागितली होती. त्यानुसार पवार यांच्याविरुद्ध एकही गुन्हा दाखल नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त (सुरक्षा) नवी दिल्ली यांना देण्यात आली आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
याबाबत मंगळवारी रात्री पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याशी संपर्क साधून पवार यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्य़ांची माहिती पाठविण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत का, याबाबत विचारणा केली असता त्यांनी, अशी कोणतीही माहिती गोळा केली जात नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, याबाबतच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर बुधवारी पुणे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक काढून, सर्वोच्च न्यायालयाकडून दिल्ली पोलिसांना ही माहिती मागविण्यात आली होती. त्यांनी ही माहिती पुणे पोलिसांना मागविल्यानंतर सर्व पोलीस निरीक्षकांना ही माहिती तत्काळ देण्याचे आदेश दिले असल्याचे म्हटले आहे.
शरद पवार यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल नाहीत!
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याविरुद्ध एकही गुन्हा दाखल नसल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिल्लीला पाठवली आहे. पोलीस संरक्षण पुरविण्यात आलेल्या व्यक्तींची माहिती सर्वोच्च न्यायालयाला सादर करण्यासाठी ही माहिती दिल्ली पोलिसांनी मागवली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
First published on: 14-03-2013 at 02:12 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No crime noted against sharad pawar pune police