पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी उपचारास नकार दिल्याने गर्भवतीचा मृत्यू झाला होता. याची गंभीर दखल घेऊन धर्मादायसह खासगी रुग्णालयांचे नियमन अधिक कठोर करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली. रुग्ण आल्यास त्याच्यावर उपचार करणे बंधनकारक करणारी ‘नो डिनायल पॉलिसी’ सर्व रुग्णालयांसाठी आणण्याचेही त्यांनी या वेळी जाहीर केले.

आरोग्य विभागाच्या राज्य कुटुंबकल्याण भवन आणि प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन शुक्रवारी अजित पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ अंतर्गत ४३ नवीन दवाखान्यांचे उद्घाटनही करण्यात आले. या प्रसंगी अजित पवार बोलत होते. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की पुण्यासारखी घटना भविष्यात घडू नये, यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. सरकारने आरोग्य यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यासाठी निर्णय घेतले आहेत. सरकारकडून रुग्णसेवेसाठी धर्मादाय रुग्णालयांना जमीन आणि अन्य सवलती दिल्या जातात. त्यानुसार या रुग्णालयांनी गरीब रुग्णांसाठी रुग्णशय्या राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, राखीव रुग्णशय्यांबाबत ही रुग्णालये गडबड करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे धर्मादायसह खासगी रुग्णालयांवर कठोर नियमन आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता रुग्णालयांसाठी ‘नो डिनायल पॉलिसी’ आणली जाणार आहे.

दोषींवर कठोर कारवाई

पुण्यातील गर्भवती ईश्वरी (तनिषा) भिसे हिला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. ही मन हेलावून टाकणारी घटना आहे. या घटनेमुळे गर्भवतीच्या परिवाराबरोबरच समाजाच्या मनावर जखम झाली आहे. या प्रकरणातून आरोग्य यंत्रणेतील त्रुटी आणि असंवेदनशीलता समोर आली. राज्य सरकारला या प्रकरणाच्या चौकशीचे अहवाल प्राप्त झाले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

सरकारी कार्यालये सरकारी जागेतच

आगामी ५० वर्षांचा विचार करून सर्व सरकारी कार्यालयांच्या इमारती बांधण्यात येत आहे. सर्व इमारती या अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक असणार आहेत. राज्यातील कोणत्याही विभागाचे कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. पुण्यामध्ये येरवड्यात नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येईल. मसुरीच्या धर्तीवर ताथवडे येथे यशदाची नवीन इमारत बांधण्यात येईल, असे पवार यांनी नमूद केले.