पुणे : शिवराज्याभिषेक लोकोत्सव म्हणून साजरा केला जातो. या सोहळ्यात राज्य सरकारही यावेळी सहभागी होणार आहे. सोहळ्यासाठी राज्य सरकारचे सहकार्य अपेक्षित आहे. मात्र, या पारंपरिक सोहळ्यात कोणताही नाटकीपणा असू नये, अशी अपेक्षा स्वराज संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केली. शिवराज्याभिषेकासाठी रायगडावर येणाऱ्या कोणत्याही शिवभक्ताला अडविण्यात येऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा >>> पुणे: रेल्वे मालामाल! महिला तिकीट तपासनीसांकडून कोट्यवधींचे उत्पन्न
शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजीराजे बोलत होते. स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव, चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स प्रा. लि. कंपनीचे संचालक सिद्धार्थ शहा, मालोजीराजे जगदाळे, निखिल काची यावेळी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या माध्यमातून येत्या सहा जून रोजी सोहळा साजरा केला जाणार आहे. त्यामध्ये तिथी किंवा तारखेचा वाद नाही. या सोहळ्याला यंदा ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. सोहळ्यात सेवा करण्यासाठी आणि त्यातील मान मिळविण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. त्यामुळे या लोकोत्सवासाठी कुणालाही निमंत्रण दिले जाणार नाही. शिवभक्तांच्या साक्षीने सोहळा पार पडतो. यासाठी सरकारचे सहकार्यही अपेक्षित आहे. मात्र, त्यात नाटकीपणा असू नये. रायगडावर सन २०१८ मध्ये गर्दी आणि कोंडी झाली होती. रायगडावर येणाऱ्या कोणत्याही शिवभक्ताला पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न करू नये. शिवभक्तांची कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये, याबाबतची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे, असे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.