पिंपरी शिक्षण मंडळातील टक्केवारीच्या वादामुळे महापालिका शाळांमधील तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांना होणारे शालेय साहित्यांचे वाटप अद्याप झाले नसल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासकीय मान्यतेचे सोपस्कार पूर्ण होऊन, आठ दिवसात वाटप होईल, अशी सातत्याने घोषणा करूनही वाटप रखडल्याने तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.
पिंपरी पालिकेच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, बूट-मोजे, पाणी, स्टेशनरी, खाली बसण्याच्या पट्टय़ा आदी साहित्याचे वाटप १६ जूनला होणे अपेक्षित होते. मंडळातील टक्केवारीचे राजकारण, सर्वाच्या ‘सोयीच्या’ पुरवठाधारकांकडून मलिदा काढण्याचे बाहेरच्या मंडळींचे डावपेच व यातून होत असलेल्या अर्थपूर्ण घडामोडींमुळे तसे होऊ शकले नाही. आयुक्तांकडे प्रशासकीय मान्यतेसाठी बरेच दिवस फाईल ‘अडली’ होती. मंडळाच्या एका माजी धंदेवाईक सदस्याने एका ‘स्वीकृत’ नेत्याचा आधार घेत काही मुद्दे उपस्थित केले, त्यामुळे दिरंगाई होत गेली. पडद्यामागे भलतेच अर्थकारण रंगले. उशीर होत असल्याने शिक्षण मंडळ सदस्यांवर टीका होऊ लागली. दोन्ही बाजूने कोंडी झाल्याने तेही आक्रमक झाले. आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने आयुक्त नरमले व त्यांनी ‘सशर्त’ सही केली. आठ दिवसात साहित्यवाटप होईल, असा विश्वास दर आठ दिवसांनी व्यक्त केला जात असून प्रत्यक्षात कार्यवाही होत नाही. करारनाम्यावर सह्य़ा राहिल्यात, असे कारण सांगितले जाते. या चालढकलीत होणाऱ्या उशिराने पालक वर्गात तीव्र संताप आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jul 2014 रोजी प्रकाशित
पिंपरीत शिक्षण मंडळातील टक्केवारीच्या वादात विद्यार्थी वेठीस
पिंपरी शिक्षण मंडळातील टक्केवारीच्या वादामुळे महापालिका शाळांमधील तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांना होणारे शालेय साहित्यांचे वाटप अद्याप झाले नसल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 14-07-2014 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No educational material to students of pimpri education board