‘‘उद्योग क्षेत्रात मनुष्यबळाची आवश्यकता असून ते मिळाल्यास विकासाला निश्चितपणे गती मिळेल. देशातील विद्यार्थ्यांत संशोधनासाठी लागणारी बुद्धिमत्ताही आहे मात्र त्यांच्या अनेक कल्पना प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत. नव्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यात सरकारी यंत्रणा कमी पडते.’’ असे मत ‘भारत फोर्ज’चे डॉ. बाबा कल्याणी यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘डिपेक्स २०१३’ या प्रदर्शनाचे बुधवारी बाबा कल्याणी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, मराठा चेंबरचे माजी अध्यक्ष प्रतापराव पवार, प्राज उद्योगसमूहाचे प्रमुख प्रमोद चौधरी, सीओईपीचे संचालक डॉ. अनिल सहस्रबुद्धे, संस्थेचे अध्यक्ष भरत अमलकर, अभाविपचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पाठक या वेळी उपस्थित होते. या प्रदर्शनात राज्यातील १८५ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी बनविलेले ४२७ संशोधन प्रकल्प प्रदर्शित करण्यात आले आहेत. हे प्रदर्शन दहा मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
बाबा कल्याणी म्हणाले, ‘‘ संशोधनासाठी लागणारी बुद्धिमत्ता देशातील तरुणांकडे आहे. मात्र संशोधनाला व्यावसायिक रूप देताना सरकारी यंत्रणांची मानसिकता अडसर ठरते. एखादा नवा उद्योग सुरू करताना शंभर सरकारी परवाने घ्यावे लागतात. नव्या उद्योगांना प्रोत्साहन दिले जात नाही.’’
डॉ. वासुदेव गाडे म्हणाले,  ‘‘देशातील विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनापैकी प्रत्यक्ष व्यावसायिक स्वरूपात येणारे संशोधन फारच थोडे असते. या संशोधनांसाठी उद्योगांचे सहकार्य मिळायला हवे. ग्रामीण भागांतील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने मोठय़ा प्रमाणावर संशोधन होण्याची गरज आहे.’’  
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No encouragement from govt for new industry baba kalyani
Show comments