लोणावळय़ातील ‘नाइट लाइफ’चे ठिकाण बनलेल्या हातवण गावाजवळील ‘टायगर पॉइंट’वर ३१ डिसेंबपर्यंत सायंकाळी सातनंतर पर्यटकांना जाता येणार नाही. सायंकाळी सातनंतर या पॉइंटवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्याचा निर्णय लोणावळा पोलिसांनी शुक्रवारी घेतला.
लोणावळा शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर हातवणच्या डोंगरावर असलेल्या या निर्सगरम्य ठिकाणी रात्र जागविण्यासाठी पुण्या-मुंबईहून मोठय़ा संख्येने तरुण-तरुणी येतात. खास ‘नाइट लाइफ’च्या मजेसाठी येथे येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. त्यामुळे येथे मोठय़ा प्रमाणात मद्याचा व अमली पदार्थाचा वापर होतो. अमली पदार्थ सेवनाचे प्रमाण वाढल्यामुळे येथे सातत्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होतो. त्यामुळे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
गेल्या शनिवारी लोणावळा पोलिसांनी पहाटे साडेतीन वाजता या ठिकाणी पाहणी केली असता एक हजारांहून अधिक तरुण-तरुणी येथे रात्र जागवताना आढळले. पोलिसांनी तेथून त्यांची हकालपट्टी केली. सहा महिन्यांपूर्वी याच ठिकाणी व्यावसायिक वादातून एकाचा खूनही झाला होता. तसेच दारूच्या नशेत दरीत पडून गंभीर अपघातही येथे घडले आहेत. काही तरुण येथील दरीच्या तोंडावर जाण्याचा प्रयत्न करतात. असा प्रयत्न करताना काही अपघात घडले आहेत.
वन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या या ठिकाणावर, वन विभाग, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आदी कोणत्याही यंत्रणेचा अंकुश नसल्याने पर्यटकांची सतत वर्दळ असलेला टायगर पॉइंट अनधिकृत व्यवसायांचा अड्डा बनला आहे. त्यामुळे येथील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि येथील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संवेदनशील बनलेल्या या ठिकाणी जाण्यासाठी सायंकाळी सातनंतर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांना बंदीचा हा निर्णय लोणावळा पोलिसांनी घेतला असून, निर्णयाची अंमलबजावणी लगेचच सुरू होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा