भाजपच्या पिंपरी शहराध्यक्षपदावरून सुरू असलेला पक्षांतर्गत वाद कायम असून पक्षश्रेष्ठींनी लक्ष घालूनही स्थानिक पातळीवर घोळ मिटवण्यात त्यांना यश आले नाही. या वादातून शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांना पक्षाच्या पिंपरी कार्यालयाचा ताबा देण्यास माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांच्या समर्थकांनी नकारघंटा दर्शविली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे खाडे यांना अद्याप पक्षकार्यालयात बसता आलेले नाही.
ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक असलेल्या खाडे यांची पिंपरी शहराध्यक्षपदी निवड झाली, तेव्हापासून एकनाथ पवार व त्यांच्या समर्थकांनी रान पेटवले आहे. शहराध्यक्षांची लायकी काढण्यापासून ते त्यांच्या निष्क्रियतेचे पाढे नेत्यांसमोर वाचण्यात आले. अजूनही खाडे यांच्या नियुक्तीचा विषय गरम आहे. खाडेंना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करायचे नाही, असे पवार गटाचे ठाम धोरण आहे. त्यामुळेच ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात निवड झाली असताना १५ दिवसानंतरही कार्यालयाचा ताबा त्यांना मिळालेला नाही. खाडे यांनी सातत्याने चावीची मागणी केली. मात्र, आज देतो, उद्या देतो, असे सांगून चालढकल सुरू असल्याचे समजते. ही बाब खाडे यांच्या समर्थकांनी वरिष्ठ नेत्यांच्याही कानावर घातली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे समजते.
यासंदर्भात, खाडे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, पवार व आपल्यात वाद नाहीत. जे झाले ते पेल्यातील वादळ होते. पवारांनी पक्षकार्यालयाची चावी न देण्याचे काही कारण नाही. चावीचे दोन सेट करण्यात येत असून त्यातील एक आजच सायंकाळी आपल्याला मिळणार आहे. वर्तमानपत्रांना चुकीची माहिती पुरवण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
भाजपच्या पिंपरी शहराध्यक्षांना पक्षकार्यालयात प्रवेशबंदी?
खाडे यांची पिंपरी शहराध्यक्षपदी निवड झाली, तेव्हापासून एकनाथ पवार व त्यांच्या समर्थकांनी रान पेटवले आहे. शहराध्यक्षांची लायकी काढण्यापासून ते त्यांच्या निष्क्रियतेचे पाढे नेत्यांसमोर वाचण्यात आले.
First published on: 13-09-2013 at 02:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No entry to bjp city president in party office