पुणे : Maharashtra Weather Forecast मोसमी पावसाला पोषक स्थिती नसल्यामुळे पुढील तीन दिवस राज्यभरात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शुक्रवार, २५ ऑगस्टपासून कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे निघून गेले आहे.
राज्यात पाऊस पडण्यास पोषक स्थिती नाही. त्यामुळे पुढील तीन दिवस राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. सोमवारी बुलडाण्यात सर्वाधिक २७ मिमी, वध्र्यात १२.४, वाशिममध्ये ४, चंद्रपुरात १.२ आणि अमरावतीत १.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडय़ात हलक्या सरी झाल्या. परभणीत २.८, बीडमध्ये १.४, औरंगाबादमध्ये १.६ मिमी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वरात ३०.६, पुण्यात ३.५, नगरमध्ये ३.४ मिमी पाऊस झाला. किनारपट्टीवर तुरळक सरी पडल्या.