दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी उपचारास नकार दिल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने चौकशीसाठी नेमलेल्या समितीने गर्भवतीच्या घरी जाऊन रविवारी तिच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविले. दरम्यान, या प्रकरणी समितीने प्राथमिक अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठविला असून, अंतिम अहवालाविषयी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सविस्तर माहिती दिली. या अहवालानुसार गर्भवती महिलेच्या मृत्यूला जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

रुपाली चाकणकरांनी आज वैद्यकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आढाव बैठक घेतली. याबाबत ते म्हणाले, “आढावा बैठक घेण्याआधी मी भिसे कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली. कोणताही व्यक्ती किंवा रुग्ण डॉक्टरांशी अनेक गोष्टी शेअर करतात. जेणेकरून डॉक्टरांकडून उत्तम उपचार मिळावेत. १५ मार्च रोजी पहिल्यांदा रुग्ण डॉ. घैसास यांना भेटले होते. रुग्णाची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री फक्त डॉक्टरांना माहीत होती. परंतु, ही घटना घडल्यानंतर रुग्णालयाने चौकशीसाठी जी अंतर्गत समिती नेमली होती, त्या समितीचा अहवाल दिला त्यात स्वतःला वाचवण्यासाठी जाहीररित्या रुग्णाची गोपनिय माहिती सोशल मीडियावर मांडल्या. ही माहिती गोपनिय ठेवण्याचा नियम आहे. याप्रकरणी आम्ही रुग्णालयाचा निषेध करतो.”

रक्तस्राव होत असतानाही उपचार झाले नाहीत

“रुग्णालायात ९ वाजून १ मिनिटांनी रुग्णाची एन्ट्री आहे. रुग्णाला २ एप्रिलला बोलावलं होतं. पण २८ मार्चला गर्भवती महिलेला रक्तस्राव होऊ लागल्याने त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यानुसार त्यांनी रुग्णालयात येण्यास सांगितलं. संबंधित स्टाफला डिलिव्हरीसाठी तयारी करण्यास सांगितलं. त्यानुसार स्टाफने ऑपरेशनचीही तयारी केली. रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्याअगोदर त्यांच्याकडून १० लाखांची मागणी केली. हे सर्व रुग्णासमोरच सुरू होतं. ते तीन लाख रुपये भरायला तयार होते. इतर पैशांची व्यवस्था आम्ही उद्यापर्यंत करू, असंही म्हणाले. मग मंत्रालयातून आणि विभागातून फोन गेले. तरीही याची दखल घेतली नाही. त्यामुळे रात्री अडीच वाजता रुग्ण बाहेर पडला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतानाही रुग्णावर कोणतेही उपचार झाले नाहीत. उलट तुमच्याकडे असलेली औषधं असतील ते घ्या आणि तुमच्या पद्धतीने रुग्णावर उपचार करण्यास रुग्णालयाने सांगितलं. या सर्व कालावधित रुग्णाची मानसिकता खचून गेली”, असं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं.

“रात्री अडीच वाजता ससून रुग्णालयात नातेवाईकांनी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. या काळात रुग्णाची मानसिकता खचली होती, त्यामुळे रुग्ण १५ मिनिटांत बाहेर आला. ते रुग्णालयात कोणालाही भेटले नाहीत. तिथून ते सूर्या रुग्णालयात गेले, चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला. खचलेली मानसकिता आणि रक्तस्राव यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

एक अहवाल आला, दोन अहवाल बाकी

चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून त्यांचा अहवाल आला आहे. डॉ. राधाकिशन पवार, डॉ. प्रशांत वाडिकर, डॉ. कल्पना कांबळे, डॉ नीना बोऱ्हाडे या सदस्यांनी हा अहवाल सादर केला आहे. दीनानाथ रुग्णालय, ससून रुग्णालय आणि सूर्या रुग्णालयाचा अहवाल यात दिला आहे. हा मृत्यू माता मृत्यू असल्याने यासंदर्भातील सखोल चौकशी माता मृत्यू अन्वेषण समितीअंतर्गत करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व बाबींचा अहवाल अंतिम अहवाल आज सायंकाळी जाहीर होईल. धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून त्याचा अहवाल उद्या सकाळपर्यंत सादर होईल.