शहरातील फलकबाजीच्या विरोधात पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोलॅबोरेटिव्ह रिस्पॉन्स या स्वयंसेवी गटातर्फे ‘नो फ्लेक्स’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. महापालिका प्रशासन, राजकीय नेते आणि अन्य संस्थांनीही या बाबत पुढाकार घेण्याची मागणी करण्यात आली आहे. पीपीसीआर हा स्वयंसेवी गट करोना काळात स्थापन करण्यात आला. पीपीसीआरमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. करोना काळात आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी या समूहाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. करोनानंतर आता हा गट शहरातील समस्यांबाबत काम करत आहे. त्यात प्रामुख्याने कचरा समस्येवर काम करण्यात येत आहे. त्याशिवाय आता फलकबाजीमुळे होणारे शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी ‘नो फ्लेक्स’ मोहीम हाती घेण्यात आली आहे.
हेही वाचा >>>पुणे: पाळीव श्वान भुंकल्याने वाद; महिलेला शिवीगाळ करुन धमकी
या मोहिमेत सहभागी होण्यासाठी bit.ly/ppcr-flexnako या दुव्याद्वारे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘नो फ्लेक्स’ मोहिमेबाबत पीपीसीआर गटाचे प्रमुख सुधीर मेहता यांच्यासह आशिष भंडारी, राजीव खेर आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची नुकतीच भेट घेऊन या मोहिमेबाबत चर्चा केली. या वेळी आयुक्तांनी महापालिकेने अतिक्रमणे आणि अनधिकृत होर्डिंगवर केलेल्या कारवाईची माहिती दिली.
‘नो फ्लेक्स’ मोहिमेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. आता प्रशासन, राजकीय नेते आणि इतर संस्थांनी स्वतःहून पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. – सुधीर मेहता, पीपीसीआर