शहरात सध्या एकवेळ पाणी दिले जात असून उन्हाळ्यातही अशाचप्रकारे पाणीपुरवठा केला जाईल. उन्हाळ्यासाठी जास्तीची पाणीकपात केली जाणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांबरोबर झालेल्या बैठकीत दिली.
पुणे शहराच्या पाणीप्रश्नाबाबत नगरसेवकांबरोबर सध्या आयुक्त महेश पाठक यांच्या पक्षनिहाय बैठका सुरू असून बुधवारी भाजपच्या नगरसेवकांबरोबर आयुक्तांची बैठक झाली. नगर अभियंता प्रशांत वाघमारे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीची माहिती नगरसेविका प्रा. मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सध्या शहराच्या बहुसंख्य भागात एकवेळ पाणी दिले जात आहे. तसेच पाणीकपातही सुरू आहे. गेल्यावर्षी उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात पाणीकपात करण्यात आली होती. यंदाचे उन्हाळ्याचे नियोजन काय आहे, अशी विचारणा बैठकीच्या प्रारंभीच नगरसेवकांनी केली. त्यावर ‘धरणात १२.२१ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. हा साठा ३१ जुलैपर्यंत पुरवायचा आहे. सध्या पुण्यात प्रतिमहिन्याला सव्वा टीएमसी पाणीवापर सुरू असून सध्याच्याच पद्धतीने उन्हाळ्यातही पाणीपुरवठा केला जाईल. उन्हाळ्यात आणखी कपात केली जाणार नाही’ असे यावेळी प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आल्याचे प्रा. कुलकर्णी यांनी सांगितले. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते. त्याबाबत काही नियोजन तूर्त केलेले नसल्याचेही बैठकीत नगरसेवकांना सांगण्यात आले. शहराच्या पाणीपुरवठय़ात कोणतीही सुधारणा झालेली नाही. मात्र, आता कमी प्रमाणात येणाऱ्या पाण्याची सवय आता पुणेकरांनी करून घेतली आहे, असा मुद्दा यावेळी कुलकर्णी यांनी मांडला.
महापालिकेची सर्व कार्यालये, शिक्षण मंडळाच्या शाळा, महापालिकेने उभारलेली भवने, उद्याने आदी सर्व ठिकाणी पर्जन्यजल सुधारणासाठी महापालिकेने योजना हाती घ्यावी, अशीही मागणी आम्ही या बैठकीत केली आणि ती प्रशासनाने मान्य केली आहे. येत्या पाच वर्षांत महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये तसेच अन्य वास्तूंमध्ये हा प्रयोग सुरू केला जाईल. त्याला टप्प्याटप्प्याने निधी दिला जाईल. तसेच आमदार व खासदार निधीतूनही ही योजना राबवली जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले, अशीही माहिती प्रा. कुलकर्णी यांनी दिली. पाण्याची गळती, तसेच असमान वितरण याबाबत लवकरात लवकर उपाययोजना केली जाईल. तसेच अनधिकृत नळजोडांसाठी आणि व्यावसायिक वापराच्या पाणी मीटरसाठी अभय योजना जाहीर केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
निधीचे वर्गीकरण करावे लागणार
पाणीपुरवठय़ासाठी आयुक्तांच्या अंदाजपत्रकात ४०० कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, स्थायी समितीने त्यात ८० कोटी रुपयांची कपात केली असून ते पैसे अन्यत्र वळवले आहेत. प्रत्यक्षात, या ३२० कोटींमधील मोठी रक्कम पगार तसेच देखभाल व दैनंदिन खर्चासाठीच लागणार असल्यामुळे पाणीपुरवठय़ाचे नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी इतर कामांसाठीची तरतूद या प्रकल्पांकडे वळवावी लागणार आहे. परिणामी, अंदाजपत्रकाची अंमलबजावणी सुरू होण्याआधीच अंदाजपत्रकातून किमान १०० कोटी रुपयांचे वर्गीकरण करावे लागणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– उन्हाळ्यातही सध्याप्रमाणेच पाणीपुरवठा
– पालिकेच्या वास्तूंमध्ये पर्जन्यजल संधारण योजना
– गळतीबाबत तातडीने उपाययोजना
– बेकायदशीर नळजोडांसाठी अभय योजना

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No further reduction in water supply in summer commissioner
Show comments