लिंबू, मिरच्या, बिबवा एकत्रित बांधून त्यांना वास्तू किंवा व्यवसायाच्या ठिकाणी टांगल्यामुळे कुणाची दृष्ट लागत नसल्याचा समज मोडीत काढण्यासाठी रिक्षा चालकांनी पुढाकार घेतला आहे. सिंहगड रस्त्यावरील रिक्षा चालकांनी या अंधश्रद्धेतून बाहेर पडत आता रिक्षाला ‘लिंबू-मिरची’ न लटकविण्याचा संकल्प केला व त्यातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहिली.
दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ त्याचप्रमाणे त्यांच्या हल्लेखोरांचा तातडीने शोध घेण्याची मागणी करीत रिक्षा चालकांनी नुकतेच या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यात ‘लिंबू-मिरची’च्या अंधश्रद्धेला सोडून देण्याचा कौतुकास्पद संकल्प करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक संघटनेच्या वतीने त्यासाठी पुढाकार घेण्यात आला. सिंहगड रस्ता भागात व्यवसाय करणाऱ्या अडीचशेहून अधिक रिक्षा चालकांनी या उपक्रमात सहभाग घेतला व या पुढे रिक्षाला ‘लिंबू-मिरची’ न टांगण्याची व अंधश्रद्धेला बळी न पडण्याची शपथही घेतली.
डॉ. दाभोलकरांनी आयुष्यभर अंधश्रद्धांवर प्रहार केले. सामान्य माणूस या अंधश्रद्धेत फसला जाऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या हत्येचा निषेध म्हणून रिक्षाला या पुढे ‘िलबू-मिरची’ न टांगण्याचा निर्धार आम्ही केला, असे रिक्षा चालकांनी सांगितले. केवळ स्वत:च अंधश्रद्धेतून बाहेर न पडता जमेल त्या मार्गाने लोकांचे प्रबोधनही करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असेही त्यांनी सांगितले.
रिक्षा चालकांच्या या संकल्पाचे समाजाच्या विविध स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. संघटनेचे पदाधिकारी सचिन लाटे यांनी याबाबत सांगितले, की अंधश्रद्धेबाबत रिक्षा चालकांचे प्रबोधन व्हावे, या हेतूने आम्ही या उपक्रमाचे आयोजन केले होते. दाभोलकरांना श्रद्धांजली म्हणून आम्ही कोणती अंधश्रद्धा सोडू शकतो, या विचारातून हा निर्धार करण्यात आला. रिक्षाला ‘िलबू-मिरची’ न टांगल्याने काहीही होत नाही, हे आम्ही रिक्षा चालकांना पटवून दिले व त्यातून त्यांच्या विचारात परिवर्तन झाले. त्याच दिवसापासून या अंधश्रद्धेतून मुक्त होण्याची शपथ आम्ही घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा