मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्याकडे काही वर्षांपासून असलेली पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसची संपर्कमंत्र्याची जबाबदारी आता कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे द्यावी, अशी मागणी पक्षातूनच जोर धरू लागली आहे. काँग्रेसमधील एक गट हर्षवर्धन पाटील यांच्यामागे ठाम असला तरी दुसऱ्या प्रभावी गटाने विखे पाटलांच्या नावाचा आग्रह धरला आहे. त्यामुळे नगर व इंदापुरात सद्दी असलेले ‘पाटील’ आता पिंपरीचा ‘कारभारी’ होण्यावरून एकमेकांच्या आमने-सामने आले आहेत.
एकत्रित काँग्रेस असताना िपपरी-चिंचवड हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून काँग्रेसला ग्रहण लागले, ते सुटलेच नाही. दिवंगत रामकृष्ण मोरे कार्यरत होते, तोपर्यंत काहीतरी ‘जान’ असलेल्या काँग्रेसला नंतर पोरकेपणाची अवस्था झाली. मोरेंनी शेवटपर्यंत पवार काका-पुतण्याशी संघर्षांचे राजकारण केले. मोरेंच्या निधनानंतर त्या ताकदीचा नेता काँग्रेसला मिळाला नाही. पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांनी नेतृत्व करावे, अशी गळ काहींनी घातली. सुरुवातीला नन्नाचा पाढा म्हणणाऱ्या कलमाडींनी नंतर नेतृत्व स्वीकारले. त्यांचे दरबारी राजकारण पचनी न पडल्याने स्थानिक नेत्यांनी त्यांना साथ दिली नाही. ‘भाई’ कलमाडींनी शहरात लक्ष घातल्याने पवार ‘दादा’ मात्र बिघडले व अचूक वेळ साधून आपल्या हस्तकांमार्फत त्यांनी काँग्रेसला भगदाड पाडण्याची खेळी केली. त्याचा कलमाडींना जोरदार झटका बसला. पुढे पालिका निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले. दिवसेंदिवस प्रतिकूल होत चाललेली परिस्थिती पाहून कलमाडींनी येथील लक्ष काढून घेतले. तेव्हा हर्षवर्धन पाटील यांच्याकडे कारभार आला. पाटील यांचेही नेतृत्व पक्षात सर्वमान्य होऊ शकले नाही. शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या समर्थक गटाने कायम त्यांच्याविरोधात कुरघोडीचे राजकारण केले. हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम व भोईरांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा दारूण पराभवास सामोरे जावे लागले. सद्यस्थितीत काँग्रेसची अवस्था नेता नसल्याने भरकटलेली सेना, अशी आहे. त्यामुळेच आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कारभारी बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हर्षवर्धन यांना हटवून विखेंना शहरात सक्रिय करण्याचे प्रयत्न पध्दतशीरपणे सुरू आहेत.
पिंपरीत नुकतेच एका कार्यक्रमासाठी विखे आले. तेव्हा, ‘जबाबदारी दिली तर स्वीकारू, कसलीही अडचण नाही’ असे सूचक विधान त्यांनी भाषणात केले. रामकृष्ण मोरे होते तेव्हाची सशक्त काँग्रेस आता राहिली नाही. काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची गरज आहे. काँग्रेसने कायम विरोधी पक्षात राहण्याची मानसिकता सोडून द्यावी व सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करावा. मोठय़ा व धनाढय़ लॉबीशी लढायचे आहे. पैशाच्या जोरावर काहीही करू शकतो, अशी ‘त्यांची’ धारणा आहे, असे राष्ट्रवादीला उद्देशून संबोधित करतानाच आपण कार्यकर्त्यांना ताकद देऊ, अशी ग्वाही विखेंनी दिली व शहर काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारण्यास स्वारस्थ दाखवले होते. आतापर्यंतचा इतिहास पाहता पिंपरीत काँग्रेसला राष्ट्रवादीशीच लढायचे आहे. काँग्रेसचा कारभारी हर्षवर्धन पाटील असो की राधाकृष्ण विखे पाटील, त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीच दोन हात करावे लागणार आहेत.
पिंपरीत काँग्रेसचा ‘कारभारी’ बदलण्याच्या हालचाली
मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्याकडे असलेली पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसची संपर्कमंत्र्याची जबाबदारी आता कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे द्यावी, अशी मागणी पक्षातूनच जोर धरू लागली आहे.
Written by आसाराम लोमटे
Updated:
First published on: 12-04-2013 at 02:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No harshavardhan patil but vikhe patil demand in pimpri congress