कोणतीही करवाढ नसलेले, २७७ कोटी शिलकीचे आणि नव्या प्रकल्पांची घोषणा न करता सुरू असलेली विकासकामेच पूर्ण करण्यावर भर देणारे पिंपरी पालिकेचे २०१६-१७ चे दोन हजार ७०७ कोटींचे अंदाजपत्रक आयुक्त राजीव जाधव यांनी मंगळवारी स्थायी समितीला सादर केले. दोन वर्षांत ६०० कोटींची बचत केल्याचा दावा करत आयुक्त राजीव जाधव यांनी दरवर्षी भरीव उत्पन्नवाढीचे नियोजन असल्याचे स्पष्ट केले. तीन वर्षांत संपूर्ण शहर एलईडी दिव्यांचे करण्याचा निर्धार करत २४ तास पाणीपुरवठय़ाच्या नियोजनाचा पुनरूच्चार करण्यात आला आहे. सर्व उड्डाणपुलांची कामे मार्गी लावण्याचे उद्दिष्ट ठेवून भव्य रस्ते, बीआरटी मार्गाचा विस्तार, वातानुकूलित बससेवा देत यापूर्वी गुंडाळून ठेवलेल्या ‘ट्राम’ची नव्याने टूमही काढण्यात आली आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आयुक्तांनी स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर केले. समितीने अभ्यासासाठी सभा तहकूब केल्याचे शितोळेंनी जाहीर केले. आयुक्तांनी सभेत सांगितले की, सुरू प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी भरीव तरतूद आहे. कोणताही नवीन प्रकल्प नसला तरी संभाव्य नवीन योजनांसाठी पाच कोटी ठेवले आहेत. आगामी आर्थिक वर्षांत जवळपास ३९१ कोटी रूपये वाढीव महसूल अपेक्षित धरला आहे. एलबीटीतून १३५० कोटी, करसंकलन ४५० कोटी, बांधकाम परवानगी ३०० कोटी, पाणीपट्टी ६० कोटी रूपये अपेक्षित धरले आहेत. शासनाच्या नवीन टीडीआर धोरणाचा पालिकेला फायदा होणार आहे. दरवर्षी २०० ते ३०० कोटी रूपये उत्पन्न वाढेल, यादृष्टीने प्रयत्नशील आहोत. ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पिंपरीचा समावेश होईल, असे गृहीत धरण्यात आले असून त्याकरिता ५० लाखांची तरतूद आहे. ‘स्वच्छ भारत’ योजनेसाठी १८ कोटी आहेत. पालिकेच्या सहाही क्षेत्रीय कार्यालयांसाठी मिळून २२४ कोटी रूपये देण्यात आले आहेत. रस्ते खोदाईसाठी प्रत्येकी १० कोटी याप्रमाणे ६० कोटी रूपये तरतूद आहे. आकुर्डीतील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सिमेंटचा रस्ता, कमान, म्यूरल करण्यात येणार असून त्यासाठी साडेतीन कोटी रूपये तरतूद आहे. थेरगावच्या डांगे चौकात शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. घरकुलची उर्वरित घरे दोन वर्षांत मिळणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा