कोथरूड उड्डाणपुलाजवळील केदार एम्पायर या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सर्व बाबी नियमानुसारच झालेल्या असून पुनर्वसनात कोणतीही अनियमितता नाही. इमारत व त्यातील सोयी-सुविधा सुस्थितीत ठेवणे ही जबाबदारी सोसायटीची आहे. विकसकाला त्याला जबाबदार धरता येणार नाही, असा दावा विकसकांकडून करण्यात आला आहे.
ही झोपडपट्टी पुनर्वसन योजना केदार असोसिएटस्तर्फे करण्यात आली असून त्याबाबत माहिती देताना भागीदार सूर्यकांत निकम म्हणाले की, मुळातच ही एसआरएची योजना नाही. स्थानिक नगरसेवक प्रशांत बधे तसेच नगरसेवक बाळासाहेब बोडके यांच्याकडून या पुनर्वसन योजनेबाबत दिशाभूल करून खोटी माहिती दिली जात आहे.
या इमारतीचे संपूर्ण बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणेच झालेले आहे. गाळेधारकांनाही तात्कालिक नियमाप्रमाणेच गाळे देण्यात आलेले आहेत. तसेच, तेथील लिफ्टच्या वापराचा परवानाही प्राप्त झालेला आहे. लिफ्टसह पाण्याच्या पंपाबाबत पंधरा वर्षे देखभाल-दुरुस्तीचा करारनामा करण्यात आलेला असून पंधरा वर्षांचे आगाऊ धनादेशही संबंधित कंपनीला दिलेले आहेत. मीटर व अन्य आवश्यक सुविधाही देण्यात आलेल्या होत्या. त्याचे ना हरकत प्रमाणपत्रही मिळालेले आहे. इमारत बांधून सोसायटीकडे हस्तांतरित केल्यानंतर त्यापुढील देखभाल व अन्य कामांची जबाबदारी विकसकाची नाही. ती सोसायटीची जबाबदारी आहे. या ठिकाणी अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून देणे हे बंधन विकसकावर नव्हते व तशी जागा नकाशातही दर्शवण्यात आलेली नव्हती, असेही निकम यांनी सांगितले.
संपूर्ण इमारतीचा वापर मंजूर नकाशाप्रमाणेच आहे. तेथे कोणतेही अतिक्रमण नाही. तसेच पार्किंगच्या जागेचाही बेकायदेशीर वापर येथे झालेला नाही. पुनर्वसन इमारतीचा बांधकाम दर्जाही योग्य आहे. गाळेधारकांनीच या योजनेची व्यवस्था योग्यप्रकारे ठेवलेली नाही. त्याचे खापर नगरसेवकांकडून आमच्यावर फोडले जात आहे, असेही ते म्हणाले.