शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी तसेच कलादालनासाठी गरवारे बालभवनची जागा घेतली जाणार नाही, असे बुधवारी स्पष्ट करण्यात आल्यामुळे बालभवनच्या जागेसंबंधी सुरू झालेला वाद संपुष्टात आला आहे.
गरवारे बालभवनची काही जागा ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या कलादालनासाठी घेण्याचा घाट शिवसेनेने घातला होता. या प्रकाराला जोरदार हरकत घेण्यात आल्यानंतर शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ यांनी बुधवारी तातडीने बालभवनची जागा स्मारकासाठी घेतली जाणार नाही, असे महापालिकेच्या सभेत जाहीर केले. गरवारे बालभवनशेजारी असलेली फायनल प्लॉट क्रमांक ४० बी २, महापालिका कोठीलगत, प्रभाग क्रमांक ५७ ही जागा कलादालनासाठी घेतली जाणार होती. मात्र, तसा निर्णय झाल्यानंतर या जागेशेजारची बालभवनची काही जागा घेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. या प्रकाराला बालभवनशी संबंधित अनेक घटकांनी विरोध केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांनीही आयुक्तांना पत्र देऊन बालभवनचे मैदान मुलांच्या हक्काचे असल्यामुळे ते हिरावून घेऊ नये, अशी मागणी या पत्रातून केली.
दरम्यान स्मारकासाठी वर्गीकरणातून ७० लाख रुपये देण्याचा ठराव मुख्य सभेत बुधवारी एकमताने संमत करण्यात आला. तसेच फायनल प्लॉट क्रमांक ४० बी २ ऐवजी ४० बी १ येथे स्मारक करावे असा बदल करणारी उपसूचना हरणावळ यांनी सभेत दिली. ही उपसूचनाही एकमताने संमत करण्यात आली.
अनावश्यक संघर्ष- वनारसे
गरवारे बालभवनची जागा पुन्हा एकदा सार्वजनिक वादाचा मुद्दा बनली आहे. बालभवनमध्ये कोणीही लढण्यासाठी येत नाही. त्यामुळे तेथे चाललेली ही अनावश्यक संघर्षांची गाथा कोणासाठी गौरवगाथा थोडीच ठरणार आहे, असा प्रश्न डॉ. श्यामला वनारसे यांनी या वादाच्या निमित्ताने सर्वाना विचारला असून या प्रश्नाकडे सर्व सत्ताधारी, प्रशासक आणि अन्य मंडळींनी व्यापक नजरेने पाहून त्यातून तोडगा काढावा, अशी कळकळीची विनंतीही वनारसे यांनी केली आहे.
 

Story img Loader