पिंपरी पालिकेच्या चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृहाला गेल्या चार महिन्यांपासून व्यवस्थापकच नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत असून गतिमान प्रशासनाचा दावा करणाऱ्या महापालिकेकडून याबाबत कोणतीच कार्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
काही वर्षांपूर्वी शशिकांत बोधनी यांच्याकडे पूर्ण वेळ व्यवस्थापकपद होते. त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांना दोन टर्म सल्लागार म्हणून नियुक्ती देण्यात आली. पुढे, विजय गावडे व त्यानंतर सुरेंद्र भुजबळ यांच्याकडे प्रभारी सूत्रे होती. मात्र, पूर्ण वेळ व्यवस्थापक देण्यात आलाच नाही. त्यानंतर, नंदकिशोर वाघ यांच्याकडे नाटय़गृहाचा कारभार सोपवण्यात आला, त्यांना हे काम झेपले नाही. त्यामुळे बदली करून घेण्यासाठी त्यांनी स्वतच: तगादा लावला होता. महापालिकेचे चारचे सहा प्रभाग झाले, त्यामध्ये वाघ यांची बदली झाली. मात्र, तेव्हापासून नाटय़गृहाची जबाबदारी रामभरोसे आहे. सध्या लिपिक दत्ता तिकोणे यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी आहे. त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण पडतो आहे. व्यवस्थापक नसल्याने कामाचे नियोजन होत नाही. ठोस निर्णय घेता येत नाही. किरकोळ कामांसाठी ‘साहेब’ मंडळींकडे जावे लागते, त्यांना क्षुल्लक कामांसाठी वेळ नसतो. प्रत्येक फाइल मुख्यालयात न्यावी लागते. तारखांचे वाटप व्यवस्थित होत नाही. पुढाऱ्यांच्या नावाखाली नाटय़गृहात दलालीचा धंदा सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर, नाटय़गृहातील व्यवस्थापकपदाचा घोळ मिटवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No manager for ramkrishna more theater last 4 months