सेवा करायची असल्यास त्यासाठी त्यागाची गरज नाही. नोकरीत राहून प्रामाणिकपणे आपापले काम केले, तरी मोठी सेवा होईल, असे विचार सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.
उमदा समाज विकास प्रतिष्ठान, नॉन रेसिडेन्ट इंडियन पेरेन्ट्स ऑर्गनाझेशन (नृपो), सुहृदय ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमटे यांच्या कार्यासाठी विविध संस्थांकडून सामाजिक कृतज्ञता निधी देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. मंदाकिनी आमटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद दाबक, नृपोचे अध्यक्ष नंदकुमार स्वादी, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी तसेच डॉ. के. एच. संचेती, डॉ. एच. व्ही. सरदेसाई, डॉ. शिरीष साठे आदी या वेळी उपस्थित होते.
आमटे म्हणाले, प्रत्येक कामाची झेरॉक्स होऊ शकत नाही. प्रत्येकाने जमेल तसे समाजासाठी आपापल्या पद्धतीने काम केले पाहिजे. समाजातील तरुणांमध्ये संवेदनशीलता आहे, मात्र त्यांना केवळ योग्य दिशा देण्याची गरज आहे. सध्या खेडय़ात कोणता डॉक्टर जायला तयार होत नाही. शाळेत तपासणीला कोण येत नाही म्हणून शिक्षक काम करीत नाहीत. आर्थिक दरीपेक्षा शिक्षणाची दरी मोठी आहे. आपापल्या नोकरीत राहून प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम केले, तरी मोठी सेवा होईल. प्रत्येकाने चांगले काम केले, तर परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही. गरिबाचे शोषण होणार नाही, हे पाहिले तरीही ती मोठी सेवा ठरेल.
आदिवासींसाठी आम्ही जे काही केले ते आनंदाने केले. त्याचे फळ मिळाले. आज तिसरी पिढी काम करते आहे व चवथी पिढी तयार आहे. आमचा प्रकल्प समाजाने उचलून धरला. न मागता लोकांनी मदत केली. त्यातून काम वाढत राहिले.

Story img Loader