पुणे : रुग्णालयात कुणी औषधोपचारांसाठी दाखल असताना रुग्णालयांशी संलग्न औषध दुकानांमधून औषध खरेदीची सक्ती अनेकांनी अनुभवली असेल. कदाचित बाहेरील एखाद्या औषध विक्रेत्याकडे किंवा घाऊक विक्रेत्याकडे कमी किमतीत उपलब्ध असलेली औषधे चढय़ा किमतीला विकत घेण्याचा नाइलाजही अनेकदा झाला असेल. मात्र, रुग्णालयांशी संलग्न औषध दुकानांतून औषध खरेदी करणे बंधनकारक नसल्याचा निर्वाळा अन्न आणि औषध प्रशासनाने दिला आहे.
त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलासा मिळू शकणार आहे. औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० अंतर्गत नियमांचा दाखला देऊन अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) कडून या बाबतचे आदेश प्रसृत करण्यात आले आहेत. एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी याबाबतचे पत्र नुकतेच प्रसिद्ध केले आहे. हे पत्र राज्यातील सर्व विभागीय सह-आयुक्त, सहायक आयुक्त आणि औषध निरीक्षक (औषधे) यांना या पत्राच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत. रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे. पत्र प्रसिद्ध करण्याबरोबरच त्याबाबतची स्पष्ट सूचना देणारा फलक रुग्णालयांच्या दर्शनी भागात लावण्यात यावा, असेही या पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
फलक लावणे बंधनकारक
रुग्णांनी रुग्णालयाशी संलग्न औषध दुकानांतूनच औषधांची खरेदी करणे बंधनकारक नसून कोणत्याही नोंदणीकृत औषध विक्रेत्याकडून रुग्ण किंवा त्यांचे कुटुंबीय औषध खरेदी करू शकतात, असा स्पष्ट उल्लेख असलेले फलक रुग्णालयांनी दर्शनी भागात लावावेत, असेही एफडीएने आपल्या आदेशात नमूद केले आहे.