विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) एकाचवेळी दोन पदवी अभ्यासक्रम करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठीच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यानुसार एकाचवेळी दोन पदवी अभ्यासक्रम करण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना पीएच.डी. वगळता अन्य अभ्यासक्रमांना लागू असतील असे यूजीसीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचवेळी दुसऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार नाही.
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’मध्ये नमूद केल्यानुसार शैक्षणिक प्रक्रिया अनुभवाधिष्ठित, सर्वसमावेशक, संशोधनाधिष्ठित आणि विद्यार्थीकेंद्रित होण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांमधील क्षमता ओळखून त्या वृद्धिंगत करण्यासाठी सोयीसुविधा निर्माण करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पूर्णवेळ शैक्षणिक अभ्यासक्रम करण्याची मुभा देण्याचा निर्णय यूजीसीने एप्रिलमध्ये घेतला होता. त्यानंतर आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या रचनेत आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना यूजीसीने मार्गदर्शक सूचनांद्वारे दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना दोन्ही अभ्यासक्रमांना उपस्थित राहता येण्यासाठी, दोन्ही अभ्यासक्रमांच्या वेळा अडचणीच्या ठरणार नाहीत याची दक्षता घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> दसरा मेळावा, ‘भारत जोडो’मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा काय संबंध? ; शरद पवार यांचा सवाल
विद्यार्थ्यांना एकाचवेळी दोन पूर्णवेळाचे अभ्यासक्रम करून पदव्या घेता येऊ शकतात. मात्र अभ्यासक्रमांमध्ये वेळेची अडचण होऊ नये या दृष्टीने एकाएच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करताना एक प्रत्यक्ष पदवी अभ्यासक्रम, तर दुसरा दूरशिक्षण किंवा ऑनलाइन पदवी अभ्यासक्रम किंवा एकाचवेळी दोन ऑनलाइन किंवा दूरशिक्षण अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. दूरशिक्षण किंवा ऑनलाइन पद्धतीने पदवी अभ्यासक्रम करण्यासाठी संबंधित संस्थेकडे तो अभ्यासक्रम राबवण्यासाठी यूजीसी किंवा नियामक परिषद किंवा केंद्र सरकारची मान्यता असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> ..तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी आले ; शरद पवार यांची कबुली
पूर्वलक्ष्यी प्रभावाने लाभ नाही
एकाचवेळी दोन पदवी अभ्यासक्रमांसंदर्भातील मार्गदर्शक सूचना परिपत्रक प्रसिद्ध झाल्यापासून लागू होतील. विद्यार्थ्यांनी परिपत्रक प्रसिद्ध होण्यापूर्वी दोन अभ्यासक्रम केले असल्यास पूर्वलक्ष्यी प्रभावाने त्याचे लाभ घेता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.