करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूच्या एकाही घटनेची नोंद झालेली नाही अशी माहिती केंद्राकडून राज्यसभेत देण्यात आली. त्यामुळे संसदेत राजकीय गदारोळ सुरु आहे. विरोधीनेते मोदी सरकारवर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, असे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केले. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भूमिका मांडली आहे.
राष्ट्रीय शीत साखळी संसाधन केंद्राचे उद्घाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले. विधानपरीषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाल्या होत्या. यावेळी आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रदीप कुमार व्यास, आरोग्य सेवा विभागाच्या संचालिका अर्चना पाटील, आमदार चेतन तुपे उपस्थित होते. त्या कार्यक्रमानंतर राजेश टोपे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
राजेश टोपे म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. मात्र देशातील अन्य राज्यात मृत्यू झाले असतील, त्या बद्दल मी भाष्य करणार नाही. तसेच अधिवेशनात सभागृहात बसलेले काही जण म्हणालेत की, ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले आहेत. पण त्यांनी राज्याचं नाव घेतलेले नाही. महाराष्ट्रात असे मृत्यू झालेले नाहीत.”
हेही वाचा – ऑक्सिजनमुळे एकही मृत्यू न झाल्याचा दावा खोडून काढणारा गडकरींचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
राज्याची दररोज १० लाख नागरिकांच्या लसीकरणाची क्षमता
राज्या लसीच्या तुटवड्यावर राजेश टोपे म्हणाले, “चार पाच दिवसात आपल्याला ८ ते १० लाख लसी मिळतात. त्यापैकी दिवसाला सरासरी २ ते ३ लाख नागरिकांचे लसीकरण होत आहे. पण आपल्या राज्याची दररोज १० लाख नागरिकांच्या लसीकरणाची क्षमता आहे. मी त्याबद्दल केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील सांगितले की, आपण सोबत जाऊन आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊ, प्रतिदिन १० लाख लसीकरणाची मागणी करू आणि राज्यातील जनतेची काळजी घेऊ”
तर शाळा सुरु करण्याबाबत निर्णय
“करोनाच्या पहिल्या रुग्णापासून आयसीएमआर कडून आलेल्या सूचनांचे आपण पालन केले आहे. आता काही नागरिकांचे सँपल घेण्यात आले आहे. काही वयोगटात अॅण्टीबॉडी सापडत आहेत. त्यामुळे शाळा सुरु करण्याचा मुद्द्यावर चर्चा होत आहे. याबाबत जर केंद्राने काही गाईड लाईन दिल्या. तर आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बोलून काही निर्णय घेऊ. तसेच राज्यात काही ठीकाणी निर्बंधामध्ये शिथिलता देण्याबाबत आम्ही अहवाल मागविला आहे. लवकरचं मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील”, असे राजेश टोपे म्हणाले.
तसेच कोल्हापूर, रायगड आणि चिपळूण येथील परिस्थिती लक्षात घेता. तेथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मेडिकल युनिट तयार करण्यात आले आहे. त्यानुसार तेथील नागरिकांना सेवा देण्याचे काम केले जाणार आहे. तसेच तिथे लसीकरण करण्यावर भर राहणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले.