िपपरी पालिकेच्या सांगण्यावरून स्मरणिका काढण्याचे काम करणारे इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक प्र. रा. अहिरराव यांना दोन वर्षे हेलपाटे मारूनही हक्काचा मोबदला मिळाला नाही. या धक्क्य़ातून ते सावरले नाहीत, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. अहिरराव यांचे बुधवारी निधन झाले.
पालिकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त शहराचा इतिहास जतन करण्याच्या हेतूने ‘संस्कृतीच्या पाऊलखुणा’ ही स्मरणिका काढण्यात आली. तत्कालीन आयुक्त दिलीप बंड व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी यांनी तोंडीच आदेश देऊन हे काम पूर्ण करण्यास अहिररावांना सांगण्यात आले होते. त्यानुसार पालिकेचे निवृत्त अधिकारी डी. डी. फुगे यांच्या सहकार्याने त्यांनी काम केले. त्यासाठी जवळपास ३५० जणांकडून माहिती घेतली. त्यापैकी दोन स्मरणिकांचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते झाले. एकूण पाच स्मरणिका काढण्याचे नियोजन होते. मात्र, प्रकाशित झालेल्या दोन्ही पुस्तकांचा मोबदला न दिल्याने त्यांनी पुढचे काम थांबवले. अहिरराव यांनी पालिकेत सातत्याने हेलपाटे मारले. मात्र, अधिकारी, नेते, जनसंपर्क विभाग यापैकी कोणीही त्यांना दाद दिली नाही.
‘असा त्रास कोणाला होऊ नये’
ज्या पध्दतीचा मानसिक त्रास आपल्या वडिलांना झाला, तसा कोणालाही होऊ नये, अशी अपेक्षा अहिरराव यांचे पुत्र डॉ. श्याम अहिरराव यांनी व्यक्त केली. या अभ्यासाच्या निमित्ताने संशोधनासाठी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांचा पगारही मिळाला नाही. अशा मानहानीमुळे ते खचले होते. त्यातच त्यांचे निधन झाले, असे ते म्हणाले.

तेव्हाच मानधन द्यायला हवे होते!
‘अहिरराव यांनी महापालिकेच्या स्मरणिकेचे काम केले व त्यांना मानधन मिळाले नाही. मात्र, त्या कामाचा करारनामा झाला नसल्याने त्याविषयीची कागदपत्रे उपलब्ध नाहीत म्हणून त्यांचे मानधन देता आले नाही,’ अशी प्रतिक्रिया आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली. तोंडी आदेश देऊन काम करून घेतले तेव्हाच मानधन रक्कम दिली असती तर बरे झाले असते, असेही ते म्हणाले.