वाढदिवस म्हटलं की सार्वजनिक रस्त्यावर मांडव टाकून वाढदिवस साजरा केला जात होता. मध्यरात्री केक कापला जात होता, आरडाओरडा आणि जल्लोष केला जात होता. मात्र यापुढे राजकीय नेत्यांसह युवा कार्यकर्ते,नागरिक यांना रस्त्यांवर वाढदिवस साजरा करता येणार नसून मित्रांना डीजेच्या तालावर थिरकता येणार नाही. कारण पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के पद्मनाभन यांनी सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यास बंदी केली आहे. यासाठी वेळ ठरवली असून रात्री दहाच्या नंतर वाढदिवस साजरा करता येणार नाही.वाढदिवस साजरा केलाच तर एक वर्षाचा करावासाची शिक्षा बर्थ-डे बॉयसह मित्रांना होऊ शकते. या कारवाईचं सामान्य नागरिकांमधून स्वागत होत असून कौतुक केलं जातं आहे. वाकड पोलिसांनी अशा प्रकारची पहिली कारवाई केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवारी मध्यरात्री सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला  वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गंगाराम उर्फ संदीप शंकर तांबे याचा वाढदिवस गुरुवारी म्हणजे आज होता.मध्यरात्री मित्रांनी केक आणून काळेवाडी येथील एका शाळेसमोर वाढदिवस साजरा करायला सुरुवात केली,मित्रांनी जल्लोष करत आरडाओरडा केला तेथील एका सजग नागरिकाने वाकड पोलिसांना फोनद्वारे याची माहिती दिली. काही मिनिटात पोलिसांनी तेथे येऊन थेट वाढदिवस असलेल्या मुलासह १३ जणांना ताब्यात घेत बेकायदेशीर जमाव जमवणे तसेच जनतेचा उपद्रव करणे या कलमांअतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी केली. या कारवाईचे आणि निर्णयाचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.

 

 

Story img Loader