लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : मोसमी पावसासाठी पोषक स्थिती नसल्यामुळे पुढील पाच दिवस राज्याच्या बहुतेक भागात पावसाची उघडीप असेल. किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात हलक्या सरींचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत मागील काही दिवसांपासून सक्रिय असलेले कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले आहे. त्यामुळे अरबी समुद्रावरून किनारपट्टीच्या दिशेने येणाऱ्या वाऱ्याचा वेग कमी झाला आहे. मोसमी पावसाचा मुख्य आस उत्तरेकडे सरकल्यामुळे उत्तर भारतात पावसाचा जोर जास्त आहे. तसेच राज्यात पाऊस पडण्यास आवश्यक असलेले कमी दाबाचे क्षेत्रही तयार झालेले नसल्यामुळे राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे हवामान विभागाने पुढील पाच दिवस किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भातील काही अपवाद वगळता राज्याच्या बहुतेक भागात मोसमी पावसाची उघडीप राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

आणखी वाचा-वाहतूक पोलिसाला लाथ मारणारा मोटारचालक अटकेत, हडपसर भागातील घटना; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मोसमी पावसाचा आस उत्तरेकडे सरकल्यामुळे उत्तरेत पावसाचा काहीसा जोर आहे. तसेच बंगालच्या उपसागरातील मोसमी वाऱ्याची शाखा काहीशी सक्रिय असल्यामुळे विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. पण, विदर्भातील पावसातही फारसा जोर असणार नाही, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यात पाऊस पडण्यास पोषक स्थिती नाही. त्यामुळे किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भातील हलक्या पावसाचा अपवाद वगळता राज्याच्या बहुतेक भागात पुढील पाच दिवस पावसाची उघडीप असेल. -एस. डी. सानप, शास्त्रज्ञ, हवामान विभाग पुणे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No rain in most of area in state for next five days due to nutrient conditions for monsoon rains pune print news dbj 20 mrj