विद्यार्थी आणि पालकांना अकरावी प्रवेशाच्या पाचव्या फेरीचीच उत्सुकता अधिक दिसत आहे. चौथ्या फेरीत सहभागीच न होता जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी पाचव्या फेरीत सहभागी होणे पसंत केले आहे. अकरावीच्या चौथ्या फेरीसाठी साधारण दीड हजारच अर्ज आले आहेत.
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची चौथी फेरी सध्या सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत असूनही कोणतेही महाविद्यालय मिळू शकले नाही, अशा ३ हजार ८५७ विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागी करून घेण्यात आले. या विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांच्या पर्यायांचे स्वतंत्रपणे अर्ज भरून घेण्यात आले. मात्र या फेरीसाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी मिळाला आहे. या फेरीपेक्षा पाचव्या विशेष फेरीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी अधिक उत्सुक असल्याचे दिसत आहे. या फेरीत साधारण १ हजार ३०० विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे.
प्रवेश मिळण्यात पुन्हा गोंधळ होण्याची शक्यता?
या फेरीसाठी ज्या १ हजार ३०० विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज भरला आहे. त्यांना यापूर्वी अर्ज भरूनही कोणत्याही महाविद्यालयांत प्रवेश मिळाला नव्हता. मिळालेले गुण आणि महाविद्यालयांचे कट ऑफ गुण आणि दिलेले पर्याय यांचा ताळमेळ न झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना तीन फे ऱ्यामध्ये प्रवेश मिळाला नाही. मात्र, या फेरीतही पुन्हा असाच गोंधळ होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या फे ऱ्यांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमानुसार वरचे महाविद्यालय (बेटरमेंट) मिळवण्याची संधीही या फेरीत मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी भरलेल्या जुन्याच अर्जाच्या अनुषंगाने त्यांना महाविद्यालयाचा पर्याय देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त दिसत असल्या, तरी त्या जागा महाविद्यालय बदलून घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सध्या महाविद्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर रिक्त जागा असल्याचे दिसत आहे. मात्र, महाविद्यालयाचे नेमके कट ऑफ गुण कळत नसल्यामुळे या फेरीसाठी नव्याने अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे.

‘दोन महिन्यांनी या..’
अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील वरिष्ठ अधिकाऱ्याचे कार्यालय.. पालकांची गर्दी. मात्र, अधिकारी बहुतेक वेळ आलेले फोन घेण्यात व्यस्त. बहुतेक साऱ्या फोनवर समोरच्याचे बोलणे ऐकून अधिकाऱ्यांचे उत्तर ‘दोन महिन्यांनी..’
सध्या हव्या त्या महाविद्यालयांत प्रवेश मिळावा म्हणून अनेक पालक स्थानिक नेते, आमदार, खासदार ते अगदी मंत्र्यांपर्यंत पोहोचत आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याची ‘जनसेवा’ ही या नेतेमंडळींकडून आवर्जून केली जात आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत सक्रिय असलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दूरध्वनी आमदार आणि मंत्र्यांच्या कॉल्समुळे सातत्याने खणखणत आहेत. मात्र, सध्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेत वशिल्याच्या प्रवेशांना जागा मिळण्यासाठी वाव नसल्यामुळे अधिकाऱ्यांची पंचाईत झाली असली, तरी नेते मंडळींच्या फोनला अधिकाऱ्यांकडून विश्वासू उत्तर मिळत आहे. ‘सध्या प्रवेश ऑनलाइन सुरू असल्यामुळे शक्य नाही. पण दोन महिन्यांनी काम करू या..’ असे उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.