महापालिका शिक्षण मंडळातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद असूनही पहिले शैक्षणिक सत्र संपले, तरीही अद्याप शिष्यवृत्ती दिली गेली नसल्याची वस्तुस्थिती उघड झाली आहे.
शिक्षण मंडळाने सन २०१३-१४ या वर्षांसाठीचे अंदाजपत्रक तयार करून ते महापालिका आयुक्तांना सादर केले होते. आयुक्तांनी त्या अंदाजपत्रकात कपात करून ते स्थायी समितीकडे पाठवले आहे. आयुक्तांकडून आलेल्या या अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी देण्याची प्रक्रिया सध्या स्थायी समितीच्या खास बैठकांमध्ये सुरू आहे. अंदाजपत्रकावर चर्चा सुरू असताना विद्यार्थी शिष्यवृत्तीबाबत सदस्यांनी माहिती घेतली असता यंदाची शिष्यवृत्ती अद्यापही दिली गेली नसल्याचे उघड झाले.
महापालिका शाळांमधील पहिली ते सातवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे. प्रत्येक शाळेत प्रत्येक इयत्तेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे तीनशे, दोनशे व शंभर रुपयाची शिष्यवृत्ती दिली जाते. पूर्वी ही रक्कम पंचाहत्तर, पन्नास आणि पंचवीस रुपये अशी होती. यंदा ही शिष्यवृत्ती किती विद्यार्थ्यांना दिली गेली अशी विचारणा बैठकीत पृथ्वीराज सुतार यांनी केल्यानंतर यंदा शिष्यवृत्ती दिली नसल्याचे सांगण्यात आले. शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांच्या माहितीचे अहवाल शाळांकडून यायचे असल्याने शिष्यवृत्ती दिली नसल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
या उत्तरामुळे सुतार यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत तरतूद असूनही गुणवंतांना शिष्यवृत्ती द्यायला एवढा उशीर का होतो, महापालिका शाळातील विद्यार्थ्यांना मंडळानेच शिष्यवृत्ती द्यायची असूनही डिसेंबर उजाडूनही ती का दिली गेली नाही, अशी विचारणा केली. मात्र, त्यावर अधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत.
प्रवासासाठी दरमहा रोख पैसे
शाळेपासून लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच बांधकाम मंजूर, रोजंदारीवरील कामगार यांच्या पाल्याना शिक्षण मंडळातर्फे प्रवास खर्चासाठी दरमहा रोख रक्कम दिली जाते, ही नवी माहिती या बैठकीत सदस्यांना मिळाली. योजनेसाठी सुमारे दीड ते दोन कोटी रुपये खर्च होतो, अशी माहिती यावेळी सुतार यांनी विचारलेल्या प्रश्नांवर देण्यात आली. या योजनेबाबतही बैठकीत विस्ताराने चर्चा झाली. तसेच अनेक सूचनाही करण्यात आल्या.

Story img Loader