महापालिकेच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत असलेला स्थानिक संस्था कर (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) बंद झाल्यामुळे उत्पन्नावाढीच्या सर्व पर्यायांचा पालिकेने गांभीर्याने विचार करावा, अशी चर्चा सुरू असली, तरी या संबंधी प्रत्यक्ष कृती करायला मात्र पदाधिकारी तयार नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या उत्पन्नवाढीचा विचार करण्यासाठी उत्पन्न समिती स्थापन करण्याचा ठराव मुख्य सभेत मंजूर झाल्यानंतर गेल्या सव्वा वर्षांत अशी समितीच स्थापन करण्यात आलेली नाही.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार १ ऑगस्टपासून एलबीटी बंद झाला आहे. गेल्या तीन महिन्यात (एप्रिल ते जून) महापालिकेला एलबीटीपोटी ३१० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. महापालिकेचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक ४,४८३ कोटी रुपयांचे आहे आणि या अंदाजपत्रकात महापालिकेने एलबीटीतून १,४०० कोटी रुपयांचे उत्पन्न गृहीत धरले होते. एलबीटी बंद झाल्यामुळे आता किमान एक हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी सर्व त्या पर्यायांचा विचार करणे आवश्यक असून त्यासाठी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात अशी बैठक अद्याप बोलावण्यात आलेली नाही.
महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी उत्पन्न समिती (रेव्हेन्यू कमिटी) स्थापन करावी अशी मागणी उपमहापौर आबा बागूल यांनी सातत्याने केली होती. महापालिकेच्या उत्पन्नाचा विचार करणारी, उत्पन्नाचे नवे पर्याय शोधणारी स्वतंत्र समिती असली पाहिजे, असा विचार करून या समितीच्या स्थापनेचा प्रस्ताव देण्यात आला होता. समितीसाठीच्या त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि स्थायी समितीने अशी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा विषय मुख्य सभेत आला. तेथे उत्पन्न समितीची स्थापना करण्याचा प्रस्ताव मे २०१४ मध्ये मंजूर करण्यात आला. महापौर आणि उपमहापौरांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी असा निर्णय झाला होता. तसेच प्रत्येक पक्षाचे दोन सदस्य या समितीमध्ये घ्यावेत, असाही निर्णय झाला होता. मात्र मे २०१४ मध्ये झालेल्या या निर्णयानुसार अशी समिती स्थापनच झालेली नाही.
उत्पन्नवाढीच्या पर्यायांचा शोध घेण्यासाठी आणि उत्पन्नवाढीचे पर्याय प्रशासनाला सुचवण्यासाठी महापालिकेची उत्पन्न समिती आवश्यक असून महापौरांकडे सातत्याने मागणी करूनही, तसेच त्यांना पत्र देऊनही समिती स्थापन झालेली नाही. समिती स्थापनेसाठी मी पुन्हा एक पत्र दिले असून आता ही समिती स्थापन झाली नाही, तर मीच पुढाकार घेऊन समिती स्थापन करणार असल्याचे उपमहापौर बागूल यांनी सांगितले.
उत्पन्न समिती कशासाठी..?
उत्पन्नवाढीचा विचार करण्यासाठी कोणतीही यंत्रणा वा समिती महापालिकेत नाही. त्यासाठी फक्त उत्पन्नवाढीचा विचार करण्यासाठी उत्पन्न समिती असावी असा ठराव मंजूर करण्यात आला होता.